यंदाची पंढरपूर वारी ‘नेत्रवारी’

यंदाची पंढरपूर वारी ‘नेत्रवारी’

पंढरपूर वारी

८ दिवसांत सुमारे ८०० जणांनी भरला नेत्रदानाचा फॉर्म

जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ३३३ वे वर्ष आहे. गेल्या आठ वर्षांपासून निरंतर संत तुकाराम महाराज यांचे वंशज स्वप्नील मोरे आणि त्यांची फेसबुक दिंडी टीम सामाजिक बांधिलकीच्या नात्याने अनेक उपक्रम करत असते. यावर्षी देखील ’नेत्रवारी’ असा उपक्रम राबवण्यात येणार आहे. जे जे कुणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या फेसबुक दिंडीत सहभाग घेतील, त्यांना या माध्यमातून नेत्रदानाचा फॉर्म भरता येणार आहे. आठ दिवसांत तब्बल ८०० जणांनी नेत्रदानाचा फॉर्म भरला आहे. १० जून हा जागतिक नेत्रदान दिवस म्हणून साजरा केला जातो, त्या दिवसाचे औचित्य साधून हा उपक्रम केला आहे.

संत तुकाराम महाराजांच्या वंशजांची फेसबुक दिंडी

फेसबुक दिंडीचा यंदाचा हा अभिनव उपक्रम यावर्षी व्यंकटेश परिवार, औरंगाबाद या अंध बांधवांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने सुरू केला आहे. ज्याचे नाव ‘नेत्रवारी’ असे आहे. ज्यामुळे भविष्यात अनके अंधबांधवांना दृष्टी मिळणार आहे. फेसबुक दिंडीच्या यावर्षीच्या ‘नेत्रवारी’ उपक्रमाला देखील नेहमीप्रमाणे भरभरून प्रतिसाद मिळेल, अशी आशा आहे. यासाठी फेसबुक दिंडी टीमचे सदस्य संत तुकाराम महाराज यांचे वंशज स्वप्नील मोरे, मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सुरज दिघे, राहुल बुलबुले, अमोल निंबाळकर, ओंकार मरकळे, सुमित चव्हाण, ओंकार महामुनी हे नेहमी अग्रेसर असतात. त्यांचे काम नक्कीच कौतुकास्पद आहे. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाचे दर्शन घडवणारी एक महान परंपरा आहे. या वारी परंपरेने महाराष्ट्राच्या सर्व जातीधर्मांना, पंथांना सामावून घेतले, अशी ही महाराष्ट्राच्या सामाजिक एकात्मतेचे दर्शन घडवणारी वारी याची देही याची डोळा अनुभवण्यासारखे सुख दुसऱ्या कुठल्याच गोष्टीत नाही. म्हणूनच ’पंढरीच्या वारीचा हा सुखसोहळा,पाहिन मी याची देही याची डोळा‘ असे म्हणत आजही लाखो वारकरी आपल्या सावळ्या विठुरायाचे गोजिरे रूप पाहाण्यासाठी वारीत पायी पंढरपूरपर्यंत चालत जातात.

अंधांना दृष्टी देणारी ठरेल वारी
ज्यांना काही कामामुळे प्रत्यक्ष वारीत सहभागी होता येत नाही असे लाखो ई-वारकरी फेसबुक दिंडीच्या माध्यमातून प्रत्यक्ष वारीत सहभागी झाल्याचा आनंद मिळवतात. गेल्या आठ वर्षांपासून फेसबुक दिंडी हे काम अविरतपणे चालू आहे. पण आजही आपल्याच समाजातील एक घटक हा सुख सोहळा पाहण्यापासून वंचित आहे, ते म्हणजे आपले अंध बांधव. त्यांना आपण ही वारी कशी दाखवू शकतो, या सध्या कल्पनेतून नेत्रवारीचा जन्म झाला.
पंढरीची वारी हे फक्त एक उदाहरण आहे, पण जगातील अशा अनेक सुंदर गोष्टी अंध बांधव बघू, अनुभवू शकत नाहीत. आपण त्यांच्याकडे फक्त दयेच्या भावनेतून न पाहता त्यांच्यासाठी काहीतरी भरीव योगदान देण्याची गरज आहे आणि म्हणूनच फेसबुक दिंडीने यावर्षी नेत्रवारी या अभियानातून सर्वांना मरणोत्तर नेत्रदान करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी फेसबुक दिंडीचे अ‍ॅप डाऊनलोड करून नेत्रदानाचा फॉर्म भरून नेत्रदाता बनू शकता.

जलसंधारणासाठीही वारी उपयोगी
सन २०१६ साली फेसबुक दिंडी टीमने राबविलेल्या पाणी वाचवा या जलसंधारणाच्या मोहिमेला लोकांनी भरभरून प्रतिसाद देत तब्बल १५ लाख नागरिकांनी फेसबुक दिंडीच्या पेजला भेट दिली. त्याप्रमाणे एका लाईकला १ रुपया मिळणार होता, ते पैसे जलसंधारणासाठी खर्च करायचे होते. त्यानुसार त्यांनी १५ लाख रुपये बारामतीच्या बऱ्हाणपूर आणि कारखेल या गावात जलसंधारणाची कामे केली. तर गतवर्षी ‘वारी ती ची’ या उपक्रमातून स्त्री भ्रूण हत्या, महिलांवरील वाढते अत्याचार, मासिक पाळी या विषयांवर प्रबोधन केले होते.


कृष्णा पांचाळ

First Published on: June 19, 2018 2:52 PM
Exit mobile version