४८ तासात मान्सूनचे आगमन, मान्सून १० दिवस आधीच दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

४८ तासात मान्सूनचे आगमन, मान्सून १० दिवस आधीच दाखल होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

This year, the monsoon will arrive in India 10 days earlier

मागील अनेक दिवसांपासून उकाडा वाढल्याने घामाच्या धारांनी नागरिक हैरान झाले आहेत. मात्र, आता वाढत्या उकाड्यापासून लवकरच दिलासा मिळणार आहे. पुढील ४८ तासात पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यंदा मान्सून भारतात १० दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

नैऋत्य मोसमी पावसाचे दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे, दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात पुढील ४८ तासांनी आगमन होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत मान्सूनच्या आगमनाची माहिती दिली आहे. मान्सूनचे १० दिवस आधीच आगमन होणार असल्याचे राज्यात मागील अनेक दिवसांपासून उच्चांकी तापमानात लाहीलाही झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर शेतकर्‍यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

या आठवड्यातच भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. दरवर्षी अंदमानमध्ये २२ मे पर्यंत मान्सून दाखल होतो. पण यंदा १३ ते १९ मे दरम्यान मान्सूनला सुरुवात होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. केरळमध्ये २० ते २६ मेपर्यंत पाऊस दाखल होईल. तर तळकोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत मान्सूनच्या आगमनाबाबत ही माहिती गुरूवारी दिली.

हवामान बदलामुळे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वातावरणीय बदलांमुळे केरळमध्ये मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. गेल्या वर्षी देखील मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज होता. मात्र, चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन उशिरा झाले होते. यंदाही अशा अडचणी आल्यास मान्सूनच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.

भारतीय मान्सूनचा पहिला अंदाज 14 एप्रिलला जाहीर केला होता. त्यानुसार, यंदा देशात पाऊस सामान्य राहण्याचा अंदाज आहे. यंदा देशात चांगला पाऊस झाल्यास शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात तळकोकणातून मान्सूनला सुरुवात होते. यंदा तळकोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे.

First Published on: May 14, 2022 5:47 PM
Exit mobile version