मुख्यमंत्र्यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

मुख्यमंत्र्यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर एअर इंडियाच्या काउंटरवर फोन करुन ही धमकी देण्यात आली आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. याशिवाय याप्रकरणी सोनेगाव पोलीस ठाण्यात अदाखलपत्र गुन्हा दाखल झाला आहे. धमकी देणाऱ्या इसमाचा तपास पोलीस घेत आहेत. ‘माझे नातेवाईक सुखरुप घर आले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण विमानतळ उडवून देईल’, अशी धमकी त्याने फोनवर दिली.

पोलिसांच्या मते धमकी देणारा माथेफिरु

दरम्यान, या घटनेबाबत माहिती देत असताना पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात धमकी देणारा कुणीतरी माथेफिरु असल्याचे बोलले जात आहे. मात्र, तरीही पोलीस याप्रकरणी सविस्तर तपास करत आहेत. हा माथेफिरु नेमका कोण होता? नेमका त्याचा उद्धेश नेमका काय होता? कि त्याचा हा खोडसाळपणा होता, याचा तपास पोलीस लावत आहेत.

यापूर्वीही आली होती जीवे मारण्याची धमकी

मुख्यमंत्री कार्यालयात १९ ऑक्टोबर रोजी एक निनावी पत्र सापडले होते. या पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या पत्रामुळे मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. गृहमंत्रालयाने याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली. धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फेब्रुवारी महिन्यात सुद्धा जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.

First Published on: November 2, 2019 10:58 PM
Exit mobile version