करोनाचे राज्यात तिघे निरीक्षणाखाली, ३७ जणांना डिस्चार्ज

करोनाचे राज्यात तिघे निरीक्षणाखाली, ३७ जणांना डिस्चार्ज

करोना व्हायरस

करोना विषाणूने आतापर्यंत चीनमधील हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, ४० हजारांहून अधिक लोकांना करोनाचा संसर्ग झाल्याचं वृत्त आहे. आजही करोना व्हायरस चीनमध्ये धुमाकूळ घालत असून १०१६ लोकांचा चीनमध्ये मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये ही खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. सध्या महाराष्ट्रात एकूण तिघांवर उपचार सुरू आहेत.

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुणे आणि मुंबई येथे तिघांना हॉस्पिटलमध्ये निरीक्षणासाठी दाखल केले आहे. आतापर्यंत राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात ३९ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी, ३६ जणांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे.

३७ जणांचे अहवाल नेगेटिव्ह –

सोमवारी संध्याकाळी एका प्रवाशाला सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळल्याने पुणे येथील नायडू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले तर एकाला मुंबई येथील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. ३७ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनासाठी निगेटिव्ह आले असून उर्वरित दोघांचे प्रयोगशाळा अहवाल बुधवारपर्यंत प्राप्त होतील. सध्या हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या ३ जणांपैकी दोघे पुणे येथील नायडू हॉस्पिटलमध्ये तर १ जण मुंबई येथील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर २५ हजार ७८२ प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून १६७ प्रवासी आले आहेत. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण १६७ प्रवाशांपैकी ८४ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

First Published on: February 11, 2020 10:11 PM
Exit mobile version