जेसीबी चोरणाऱ्या चोरांना सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनद्वारे केली अटक

जेसीबी चोरणाऱ्या चोरांना सीसीटीव्ही आणि मोबाईल लोकेशनद्वारे केली अटक

प्रातिनिधिक छायाचित्र

ठाण्यात घरफोड्या, चोऱ्या, बाईकचोरी आदी प्रकार सातत्याचे आहेत. मात्र यावेळी चोरटयांनी तर खळबळच उडवून दिली. चोरटयांनी चक्क भलामोठा जेसीबीच चोरून नेला, तोही थेट पुण्याला. यामुळे पोलिसही चक्रावून गेले. अखेर पोलिसांनी काही दिवसातच घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे पुणे जिल्ह्यातील दौंडमधील चोरट्या आरोपींचा पर्दाफाश केला. सुमित मिनिनाथ चितारे (वय २१, रा.आलेगाव, तालुका-दौंड) आणि चंद्रकांत बाळासाहेब पोटे (वय १९, रा.बोरीवेल तालुका – दौंड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून २७ लाख रुपये किमतीची जेसीबी मशीन हस्तगत केली आहे. तर यातील बाळासाहेब महादेव पोटे हा अद्याप फरार असल्याची माहिती कासार वडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किशोर खैरनार यांनी दिली.

२४ जानेवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तक्रारदार अभिमन्यू मढवी यांचे व्यावसायिक कामाकरिता वापरात असलेले जेसीबी मशीन वाघबीळ येथील घराजवळून चोरीला गेले होते. मढवी कुटुंबीयांनी ठाणे आणि मुंबई परिसरात जेसीबीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र जेसीबी न सापडल्याने याप्रकरणी कासार वडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

या चोरीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर जाधव यांच्या पथकाने घटनास्थळाचे आणि या मार्गवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याचबरोबर मोबाईल लोकेशनचा तांत्रिक अभ्यास केला असता चोरटे कल्याण, मुरबाड, जुन्नर ,पारनेर येथील असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना आला.

त्यानुसार चौकशी करीत असताना जेसीबीचे चोरटे पुणे जिल्ह्यातील दौंड येथे असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने पोलिसांनी दौंड तालुक्यातील बोरीवेल आणि आलेगाव येथून सुमित मिनिनाथ चितारे, चंद्रकांत बाळासाहेब पोटे यांना अटक करून २७ लाख रुपये किमतीची जेसीबी मशीन हस्तगत केले. तर, चंद्रकांत याचे वडील बाळासाहेब पोटे यांचा शोध सुरु आहे.

First Published on: February 3, 2020 8:20 PM
Exit mobile version