दहावीचे अर्ज भरण्यास २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

दहावीचे अर्ज भरण्यास २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

दहावीचे अर्ज भरण्यास २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

मार्च २०२० मध्ये होणार्‍या दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यात येत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे शाळांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या नियमित आणि पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्याांना अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने २० नोव्हेंबर तर विलंब शुल्कासह ३० नोव्हेबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज www.mahahsscboard.maharashrta.gov.in किंवा  www.mahasscboard.in या संकेतस्थळावर भरायचे आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळामध्ये दहावीच्या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज डेटावेबसाईटवरून १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरपर्यंत भरण्यात येत होते. तसेच  पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधारक योजनेंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज  ६ ते १५ नोव्हेंबर दरम्यान, शाळांमधून भरून घेण्यात येणार होते. परंतु, नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज भरताना शाळांना अनेक तांत्रिक आणि अन्य समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अर्ज भरण्यास विलंब होत होता. परिणामी, विद्यार्थ्यांना याचा फटका बसू नये, यासाठी राज्य मंडळाने अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नियमित, पुनर्परिक्षार्थी, यापूर्वी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणी सुधारक योजनेंतर्गत आणि तुरळक विषय घेऊन परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना २० नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. तसेच विलंब शुल्कासह २१ ते ३० नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज भरता येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे अर्ज वेबसाईटावरून सेव्ह हेात नसल्यास त्यांनी दिलेल्या मुदतीत ऑल अ‍ॅप्लिकेशनच्या लिंकवरून अर्ज भरायचे आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

First Published on: November 4, 2019 8:48 PM
Exit mobile version