Tipu sultan: जोरदार विरोधातच मालाडच्या मैदानाचे टिपू सुलतान नामकरण, राजकारण तापले

Tipu sultan: जोरदार विरोधातच मालाडच्या मैदानाचे टिपू सुलतान नामकरण, राजकारण तापले

मालाडमधील क्रीड संकुलाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलाने आंदोलना दरम्यान पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. या सर्व वादातच या मैदानाचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी झालेल्या कारवाईत काही आंदोलनकर्त्यांना पांगवण्यात आले. तर काहींना ताब्यात घेण्यात आले. या आंदोलनामुळे वाहतुकीचा खोळंबाही झाला. या सगळ्या गोंधळातच मालाडमधील मैदानाला टिपू सुलतान असे मानकरण करण्यात आले. मुंबई जिल्ह्यांचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते मैदानाचे उद्घाटन करण्यात आले.

मैदानासाठी टिपू सुलतान या नावाला विरोध करत भाजपचे आमदार आणि खासदारही आंदोलनात सहभाग झाले होते. आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत या मैदानाला टिपू सुलतान नाव देण्यावरून विरोध केला. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा नेमण्यात आला होता. मालाडच्या मालवणी परिसरात मोठ्या प्रमाणात नामकरणाचे फलक लावण्यात आले होते. मैदानाला विरोध करणारे तसेच नामकरण थांबवण्याची मागणी करणारे पत्र विश्व हिंदू परिषदेकडून याआधीच मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

हिंदुंचा अनन्वित छळ करणारा टिपू सुलतान हा देशाचा गौरव कधीच होऊ शकत नाही, त्यामुळे या मैदानाला टिपू सुलतान नाव देणे हे अयोग्य ठरेल अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. अत्याचार करणाऱ्याच महिमामंडन करण्याचे काम हे टिपू सुलतानाने केले आहे. त्यामुळेच हे त्वरीत थांबवल पाहिजे, अशी प्रतिक्रिया राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

राष्ट्रपतींनीच टिपू सुलतानचा गौरवार्थ उल्लेख केला हे भाजपा विसरला का?

ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची धर्माच्या आधारावर विभागणी करुन द्वेष पसरवणे व ध्रुवीकरणाचे राजकारण करणे ही भाजपाची विकृत पद्धती आहे. २०१७ ला कर्नाटक विधानसभेत राष्ट्रपती रामदास कोविंद यांनी टिपूचा गौरवार्थ उल्लेख केला हे भाजपा विसरला का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे. त्याचवेळी सचिन सावंत यांनी भाजप आणि टिपू सुलतान यांच्याशी संबंधित काय काय गोष्टी आहेत याचा पाढाही वाचला.

टिपू सुतलानप्रश्नी भाजपाने सुरु केलेल्या राजकारणाचा समाचार घेत सावंत पुढे म्हणाले की, इतिहासाला काळा गोरा रंगवून टिपू सुलतानच्या नावाला भाजपा विरोध करत आहे. परंतु कोल्लूर येथील श्री मुकांबिका मंदिरातील पुजारी टिपूच्या सन्मानार्थ दररोज संध्याकाळी 7:30 वाजता “सलाम मंगलारती” करतात. नंजनगुड येथील श्रीकंठेश्वर मंदिरात, टिपूने सादर केलेल्या पन्नाच्या लिंगाची पूजा सुरू आहे. नेताजी बोस यांच्या होलोग्रामचे उद्घाटन मोदींनी केले त्याच नेताजींनी टिपू सुलतानाचा शहीद म्हणून उल्लेख करून टिपूच्या म्हैसूर टायगरचा समावेश आझाद हिंद सेनेच्या झेंडा तथा गणवेशावर केला होता. पेशव्यांच्या सेनेने इंग्रजांशी मिळून श्रींगेरी मठ उध्वस्त केला,तेव्हा देवस्थानाचे रक्षण व पुनर्स्थापना टिपू सुलतानने केली होती. म्हैसूर गॅझेटमध्ये टिपू सुलतानने मदत केलेल्या १५६ मंदिरांची यादी दिली आहे याची आठवण सावंत यांनी करून दिली. “भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत” ही प्रतिज्ञा घेतलेल्या व विविधतेचे निदर्शक तिरंग्यातील तीन रंगांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने भाजपा व संघाच्या विकृत विचारधारेचा निकराने विरोध केला पाहिजे असेही सावंत यांनी ठणकावून सांगितले.


 

First Published on: January 27, 2022 8:18 AM
Exit mobile version