ओडिशात तितली तर सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीलगत ‘लुबान’ चक्रीवादळ

ओडिशात तितली तर सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीलगत ‘लुबान’ चक्रीवादळ

अरबी समुद्रावर लुबान वादळाचे सावट

ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यात तितली चक्रीवादळाने हाहाकार माजवला असतानाच पश्चिमेकडी अरबी समुद्रातही लुबान चक्रीवादळाचे सावट घोंगावत आहे. मागील काही दिवसांपासून अरबी समुद्रात ‘लुबान’ चक्रीवादळ निर्माण झाल्यानंतर भारताच्या पश्चिम किनारपट्टीलगतच्या नागरिकांना आणि मच्छिमारांना हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला होता. सध्याची उधाण स्थिती आणि ‘लुबान’ वादळाच्या एकत्रित परिणामामुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीला काल तसेच आजही जोरदार लाटांचा तडाखा बसला. किनारपट्टीभागात वारे सक्रिय नसले तरीही समुद्र खवळला असल्याने मासळीची आवक कमी राहिली. सकाळी लिलावाच्या ठिकाणी अचानक भरतीचे पाणी घुसल्याने मासेविक्रेत्यांची तारांबळ उडाली.

हे माहितेय का – तितली’ वादळ म्हणजे काय? नाव आलं कुठून? जाणून घ्या

हवामान खात्याने मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याची सूचना केल्याने अधिकतर मच्छिमारी नौका मालवण बंदरातच आश्रयासाठी राहिल्या. बंदरात थांबलेल्या नौकांवरील खलाशांना नौका ते किनारा असा छोट्या होडीतून प्रवास करताना उसळत्या लाटांचा तडाखा बसला. काही होड्या तर समुद्रात बुडता बुडता वाचल्या. मात्र किनाऱ्यावरून हे दृश्य पाहणाऱ्यांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. काही नौका देवगड बंदरात बुधवारीच आश्रयासाठी रवाना झाल्या तर उर्वरीत नौकांनी गुरुवारी देवगड बंदर गाठले.

अरबी समुद्रात मागील काही दिवस एकाच ठिकाणी स्थिरावलेल्या ‘लुबान’ चक्रीवादळाने येमेनच्या दिशेने मार्गक्रमण केल्याने येत्या काही दिवसांत येथील स्थिती पूर्ववत होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘तितली’ चक्रीवादळाने पूर्वेकडील ओडिशा किनारपट्टीला धडक दिल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर आंध्रप्रदेश किनारपट्टी लाही ‘तितली’ धडकण्याचा संभव आहे. मात्र ‘तितली’ चे थेट परिणाम पश्चिम किनारपट्टीला संभवणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. समुद्र खवळल्याने सिंधुदुर्ग किल्ला होडी सेवा गुरुवारी देखील बंद ठेवण्यात आली तर जलक्रीडा व्यवसायावर देखील याचा परिणाम झाला असून लवकरच येथील हवामान पूर्वस्थितीत येईल, अशीही शक्यता वर्तविली जात आहे.

First Published on: October 11, 2018 10:27 PM
Exit mobile version