खेकड्यांनी वाढवली शिवसेनेची डोकेदुखी

खेकड्यांनी वाढवली शिवसेनेची डोकेदुखी

उद्धव ठाकरेंनी तानाजी सावंतांना खडसावले

चिपळूण येथील तिवरे धरण खेकड्यांनी भगदाड पाडल्यामुळे फुटल्याचे अजब वक्तव्य नुकतेच जलसंधारण राज्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यांमुळे विरोधकांकडून होत असलेल्या टीकेमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. आता तानाजी सावंत यांच्या या अजब वक्तव्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील पुरते संतापले आहेत. त्यांनी तानाजी सावंत यांना फोनवरून खडसवल्याची माहिती सुत्रांनी दिली.

परंतु तानाजी सावंत यांची अशी वक्तव्ये ही काही नवी नसून याआधीदेखील त्यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणले होते. त्यामुळे आता तुम्ही मंत्री झालात, आता तरी बोलताना काळजी घ्या, अशी तंबी मंत्री महोदयांना पक्षप्रमुखांकडून देण्यात आल्याचे कळते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्र्यांनीच काय तर शिवसेनेच्या प्रत्येकाने प्रतिक्रिया देताना काळजी घेण्याची गरज असल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांना सांगण्यात आले आहे.

तानाजी सावंत यांनी याआधीही अनेकदा अशी वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान तर तानाजी सावंत यांनी मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण मी भिकारी होणार नाही, असे वादग्रस्त केले होते. तानाजी सावंत यांचे हे वक्तव्य मंत्री होण्याअगोदरचे होते. मात्र मंत्री झाल्यानंतर नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनातदेखील सरकारला आणि स्वत:ला अडचणीत आणणारे वक्तव्य विधान परिषदेत त्यांनी केले होते. राज्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केल्यानंतर जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी गैरव्यवहार झाल्याची कबुली दिली होती. तसेच जलयुक्त शिवार योजनेच्या १३०० कामांची विभागीय चौकशीदेखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले होते.

एकीकडे तानाजी सावंत यांच्यासारखे शिवसेनेचे नेते अजब दावे करत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तिवरे दुर्घटनेची साधी विचारपूसही केली नसल्याचा आरोप आता विरोधक करत आहेत. कोकणातील जनतेने शिवसेनेला भरभरून दिले असताना उद्धव ठाकरेंनी दुर्घटनास्थळी साधी भेटही दिली नाही, असा संताप आता सर्वच स्थरातून व्यक्त होत आहे.

तावडेंकडून सावंतांचे समर्थन
दरम्यान, या सर्व प्रकरणावर शिवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसताना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मात्र तानाजी सावंत यांची बाजू घेतली आहे. खेकड्यांनी धरण फोडले असे मी कधीच म्हणणार नाही. मात्र यामध्ये अधिकार्‍यांनी जशी माहिती दिली तसेच सावंत यांनी सांगितले असावे, असे सांगत तावडेंनी तानाजी सावंत यांची जणू पाठराखणच केली. दरम्यान, याबाबत तानाजी सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नंतर बोलतो असे सांगून फोन ठेवला.

First Published on: July 7, 2019 4:40 AM
Exit mobile version