विरोधकांची माहिती मिळवण्यासाठी राजकीय पक्षांकडून खाजगी गुप्तहेर नेमणार

विरोधकांची माहिती मिळवण्यासाठी राजकीय पक्षांकडून खाजगी गुप्तहेर नेमणार

विरोधकांची माहिती मिळवण्यासाठी राजकीय पक्षांकडून खाजगी गुप्तहेर नेमणार

राज्यभरात लोकसभा निवडणुकांनी जोर पकडला असून विरोधकांच्या गोटात काय सुरु आहे, विरोधक मत मिळवण्यासाठी काय खेळी खेळणार आहे, याची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी उमेदवार तसेच राजकीय पक्ष स्तरावर खाजगी गुप्तहेर नेमण्यात आलेले आहे. या गुप्तहेरांकडून विरोधकांची इत्यंभूत माहिती मिळवून निवडणुकीच्या रणभूमीत विरोधकांचा पराभूत करण्याचा चंग उमेदवार आणि पक्ष प्रमुखांकडून बांधण्यात येत आहे. मुंबई, नवीमुंबई, ठाणे या शहरांमध्ये खाजगी गुप्तहेरांना मोठी मागणी असल्याचे एका खाजगी गुप्तहेराने ‘आपलं महानगरशी’ बोलताना सांगितले.

राजकीय पक्षांकडून गुप्तहेरांची मागणी

राज्यभरात लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून आपले उमेदवार निश्चित कऱण्यात आलेले आहे. या उमेदवारांची मोर्चेबांधणी, प्रचार सभा, रॅली पदयात्रा सुरु झालेल्या आहेत. मात्र संपूर्ण लोकसभा मतदार संघ पिंजून काढण्यासाठी उमेदवारांना वेळ कमी पडणार आहे. त्यातच विरोधकांच्या गोटात नक्की काय सुरु आहे, याची माहिती काढण्यासाठी राजकीय पक्षाकडून खाजगी गुप्तहेर भाड्याने घेण्यात येत आहेत. लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर खाजगी गुप्तहेरांना राजकीय पक्ष तसेच उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात मागणी येत असल्याची माहिती एका खाजगी गुप्तहेराने दिली आहे.

गुप्तहेर कोणती कामे करतील?

राजकीय पक्षांनी भाडयाने घेतलेल्या गुप्तहेरांकडून विरोधकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची जवाबदारी असणार आहे. ज्या ठिकाणी विरोधकांकडून आचारसहिंतेचा भंग होत असेल, अथवा मतदारांना पैशाचे वाटप होत असेल त्या ठिकाणी गुप्तेहरांची मुख्य भूमिका असणार आहे. भाडयाने घेतलेले गुप्तहेर यांची काही माणसे विरोधकांच्या ताफ्यात कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सोबत फिरणार आहे. हेच कार्यकर्ते विरोधकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून विरोधकांची इत्यंभूत माहिती आपल्या उमेदवारापर्यंत पोहचवण्याचे काम करणार आहेत. विरोधकांच्या रॅली, पदयात्रा, मोर्चे, रोड शो यांचे चित्रीकरण करून तसेच छायाचित्रे काढून ती पोहचवण्याची जवाबदारी या गुप्तहेरच्या माणसांची असणार आहे.

प्रत्येक निवडणुकांना आम्हाला राजकीय पक्षाकडून विरोधकांची माहिती काढण्याचे काम देण्यात येतात, मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीला खाजगी गुप्तहेरांना जास्त महत्व प्राप्त झालेले आहे. विरोधकांची माहिती काढण्यासाठी राजकीय पक्षांकडून खाजगी गुप्तहेरांवर लाखो रुपये खर्च केले जात आहे, अशी माहिती एका खाजगी गुप्तहेर यांनी ‘आपलं महानगरशी’ बोलताना सांगितली.

First Published on: April 8, 2019 6:00 AM
Exit mobile version