राज्यात भर’पूर’; मराठवाडा मात्र अजूनही कोरडाच

राज्यात भर’पूर’; मराठवाडा मात्र अजूनही कोरडाच

मुसळधार पाऊस

मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर आपत्ती निवारण उपाययोजनेद्वारे शासन यंत्रणा मात करीत असताना उर्वरित भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याबाबत खूपच आशादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र मराठवाडा विभागात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणाला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. रविवारी सकाळपर्यंत जायकवाडी धरण १५ टक्के भरले. मात्र जायकवाडी वगळता इतर ठिकाणी पाण्याची मोठी वाणवा जाणवत आहे.

पुणे, कोल्हापूरात अतिवृष्टी

गेले दोन – तीन दिवस पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हयातील पश्चिम भागात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे पुणे जिल्हयातून वाहणा-या इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा या नदया दुथडी भरुन वाहत आहेत. त्याच प्रमाणे सातारा जिल्हयातील कृष्णा कोयना, तारळी, उमोडी या नदयांनाही पूर आलेला आहे. कोल्हापूर जिल्हयातील पंचगंगा, वारणा, या नदयासुध्दा दुथडी भरुन वाहत आहेत, अशी माहिती पुणे विभागाचे महसूल आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पूर परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून सर्व विभाग सतर्क ठेवण्यात आले आहेत. पुणे महसूल विभागात आज अखेरीस 120 टक्के पाऊस झाला आहे. पुणे विभागातील जिल्हा निहाय झालेला पाऊस खालील प्रमाणे- पुणे जिल्हा 153 टक्के, सोलापूर 78 टक्के, सातारा 150 टक्के, सांगली 188 टक्के, आणि कोल्हापूर 95 टक्के.

First Published on: August 5, 2019 5:31 AM
Exit mobile version