यशवंतराव चव्हाण यांनी रचलेल्या पायावरच आजचा आधुनिक महाराष्ट्र उभा, अजित पवारांकडून अभिवादन

यशवंतराव चव्हाण यांनी रचलेल्या पायावरच आजचा आधुनिक महाराष्ट्र उभा, अजित पवारांकडून अभिवादन

मुंबई – स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी रचलेल्या पायावरच आजचा आधुनिक, प्रगत, पुरोगामी महाराष्ट्र उभा आहे. स्वर्गीय चव्हाणांचा विचार पुढे घेऊन जाणे आणि त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे स्मरण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले आहे.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, सहकार, सिंचन, आरोग्य अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्राच्या विकासाचा भक्कम पाया रचला. कला, क्रीडा, साहित्य, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध महाराष्ट्र घडवला. नाटक, चित्रपट, गायनासारख्या कलांना प्रोत्साहन दिले. औद्योगिकरण, अर्थकारणाला आश्वासक दिशा दिली. समाजातील मागास, आदिवासी,अल्पसंख्याक, महिला, युवक या समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणून विकासाची संधी दिली. महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारणाला सुसंस्कृत चेहरा दिला असेही अजित पवार म्हणाले.


आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान आहे. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेतला. राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि नंतर देशाचे संरक्षण, अर्थ, गृह, परराष्ट्रमंत्री, उपपंतप्रधान यासारख्या महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. राजकारण, समाजकारणात कितीही उंचीवर पोहोचले तरी त्यांची नाळ जनतेशी कायम जोडलेली होती. महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर प्रभाव असलेले ते नेते होते. साधी राहणी, कलेवर प्रेम, लेखन, वाचनाची आवड हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील अनेक तरुणांमधील नेतृत्वगुण व धडाडी ओळखून त्यांना राजकारणात, समाजकारणात पुढे आणले, संधी दिली. महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात कार्य करणारे हजारो कार्यकर्ते त्यांनी घडवले. कृषी, शिक्षण, सहकार, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांची जाण असलेले ते दूरदृष्टीचे नेते होते. देशाचे संरक्षणमंत्री म्हणून देशाच्या संरक्षण सज्जतेसाठी त्यांनी केलेले कार्य, दिलेले योगदान देश कायम स्मरणात ठेवेल. त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल अशा शब्दात अजित पवार यांनी त्यांचे स्मरण केले.

First Published on: November 25, 2022 1:05 PM
Exit mobile version