टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षी २३ जुलैपासून

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षी २३ जुलैपासून
 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षी २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालवधीत होणार आहे. जपानी आयोजक आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) यांच्यात सहमत झाले असल्याची माहिती जपानमधील प्रसारमाध्यमांनी सोमवारी दिली होती.  त्यानंतर ऑलिम्पिकनेही याबाबतची अधिकृत घोषणा केली. करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आता ही स्पर्धा २०२० ऐवजी २०२१ मध्ये होणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धा लांबणीवर गेल्याची ही १२४ वर्षांच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.
आम्ही ही स्पर्धा कधी घ्यायची आणि त्याचे काय फायदे-तोटे असतील याचा विचार करत आहोत, असे टोकियो २०२० चे अध्यक्ष योशिरो मोरी म्हणाले होते. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा यावर्षी २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार होती. जपान आणि आयओसीचा ही स्पर्धा ठरल्याप्रमाणे घेण्याचा मानस होता. परंतु, करोनाच्या वाढत्या धोक्यामुळे, तसेच खेळाडू आणि क्रीडा संघटनांच्या विरोधामुळे त्यांना ही स्पर्धा पुढे ढकलणे भाग पडले.

जपानचे आर्थिक नुकसान

टोकियो ऑलिम्पिकसाठी जपानने १३ बिलियन डॉलर्स खर्ची केले होते. ही स्पर्धा लांबणीवर गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र, ज्यांनी ऑलिम्पिकची तिकिटे खरेदी केली आहेत, त्यांचा आम्हाला आदर करायचा असून आम्ही योग्य दिशेने जात आहोत, असेही मोरी यांनी नमूद केले होते.

First Published on: March 30, 2020 10:09 PM
Exit mobile version