चाकरमान्यांसाठी खुशखबर; कोकणात जाण्यासाठी टोलमाफ!

चाकरमान्यांसाठी खुशखबर; कोकणात जाण्यासाठी टोलमाफ!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची विघ्न हळूहळू कमी होत असून त्यांच्यासाठी आता एक खुशखबर आली आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी येताना क्वारंटाईनचे कठोर नियम स्थानिक प्रशासनाने घातल्यामुळे संतप्त झालेल्या चाकरमान्यांना शेवटी राज्य सरकारनेच मध्यस्थी करत दिलासा दिला होता. त्यासोबतच, चाकरमान्यांसाठी विशेष बस सेवा देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी कोणत्याही ई-पासची गरज नसल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं. आता राज्य सरकारने कोकणी माणसासाठी आणखीन एक खुशखबर आणली असून ज्या चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जायचं आहे, त्यांना टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी आणि परतीच्या प्रवासात दोन दिवस असा हा निर्णय लागू असणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांसाठी हा मोठा बोनसच ठरणार आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. यासंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. टोल सवलतीसाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानकात वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव आणि प्रवासाची तारीख नमूद केल्यास त्यांना तात्काळ टोल माफी स्टिकर मिळणार आहे. त्यासाठी नागरीकांनी जवळच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा असे मंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाआधी राज्य शासनाच्या नियमांनुसार कोरोनाची चाचणी आणि ई-पास काढणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मुंबई-गोवा मार्गाचं काम चालू असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे काही गणेशभक्त मुंबई-पुणे-सातारा मार्गे कोकणात जातात. त्यांची टोल नाक्यावर गैरसोय होऊ नये, म्हणून त्यांना टोलमध्ये सूट देण्यात आली आहे. सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत.

एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री

First Published on: August 13, 2020 5:30 PM
Exit mobile version