विकेंड निमित्त मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे तुडूंब

विकेंड निमित्त मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे तुडूंब

गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे लोकांना नाताळबरोबरच नवीन वर्षाचे स्वागत साजरे करता आले नाहीत. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पर्यटक मोठ्या प्रमाणात मुंबईबाहेर पडल्याने एक्स्प्रेस-वेवर १८ तासांहून अधिककाळ वाहतूक कोंडीत सापडलेल्या प्रवाशांची शनिवारी चांगलीच अडचण झाली. या मार्गावरील वाहतूक सररता सरत नव्हती. देशभर ओमायक्रॉनचे संकट असले तरीही दोन वर्षांची पर्यटन कसर भरून काढण्यासाठी बाहेर पडलेले नागरीक अधिक काळ एक्सप्रेस-वेवर अडकून पडले. यामुळे त्यांचा चांगलाच हिरमोड झाला.

पाच दिवसांवर येऊन ठेपेलेला वर्ष अखेर, चालू असलेला विकेंड तसेच नाताळ व गुलाबी थंडीमुळे अनेक मुंबईकर, ठाणेकर, नवी मुंबईकर एकाचवेळी मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने शनिवार, २५ डिसेंबर रोजी मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर अडकून पडले. संध्याकाळी ६ वाजल्यानंतर तर पुण्याकडे जाणार्‍या सगळ्याच मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पहायला मिळाली. २६ डिसेंबरच्या दुपारी ३ नंतर एक्स्प्रेस वेवर विरळ प्रमाणात वाहनांच्या रांगा दिसत होत्या. पुढे या रांगा अधिकच बहरल्या. तब्बल १८ तासांहून अधिक काळ ही कोंडी राहिल्याने सकाळी बाहेर पडलेले चाकरमानी सायंकाळपर्यंत याच मार्गात होते.

मागील दोन दिवसांत हळुवार चालणार्‍या वाहतुकीमुळे प्रवासी नाराज दिसून आले. दोन वर्षांनंतर हाती आलेल्या सुवर्ण संधीचा लाभ वाहतूक कोंडीने हातचा जातोय की काय या विवंचनेत वाहनधारक होते. बोरघाट वाहतूक पोलीस चौकी, खोपोली पोलीस, जिल्हा वाहतूक शाखा यांनी खालापूर टोलनाका, खोपोली एक्झिट, आडोशी टनेल, बोरघाट चौकी, अंडापॉईंट कट, शिंग्रोबा मंदिर येथील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी अहोरात्र मेहनत करताना दिसत होते. खोपोली शहरातून जाणारा चार-पदरी, जुना मुंबई-पुणे मार्गातही शिळफाटा ते खोपली दरम्यान दीड दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. इंदिरा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शासकीय दूध डेयरी ते जैन मंदिर रोडपर्यंत मागील १२ तास वाहतूक कोंडीमुळे खोपोलीकरांनाही त्रास सहन करावा लागला.

First Published on: December 26, 2021 4:17 AM
Exit mobile version