नाशिक पालिका आयुक्त गमेंची २० महिन्यात बदली; भुजबळांची ‘कृपा’ कैलास जाधवांवर

नाशिक पालिका आयुक्त गमेंची २० महिन्यात बदली; भुजबळांची ‘कृपा’ कैलास जाधवांवर
महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांची कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच म्हणजेच २० महिन्यांत बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या बदलीची चर्चा होती. महत्वाचे म्हणजे नाशिक महापालिकेत आयुक्तपदी काम करण्याची संधी मिळावी म्हणून अनेकांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे ‘फिल्डिंग’ लावली होती. त्यात भुजबळांनी जाधव यांना ‘कृपाशिर्वाद’ दिल्याची चर्चा प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात केली जात आहे. दरम्यान, राधाकृष्ण गमे हे पदोन्नतीसाठी पात्र ठरणारे अधिकारी असून, त्यांना कोणत्या विभागाची जबाबदारी दिली जाईल याचा आदेश मात्र अद्याप प्राप्त झालेला नाही.
डॉ. प्रवीणकुमार गेडाम, तुकाराम मुंढे यांच्या वादळी कारकिर्दीनंतर दीड वर्षापूर्वी म्हणजेच ६ डिसेंबर २०१८ रोजी नाशिक महापालिका आयुक्तपदाची धूरा शासनाने राधाकृष्ण गमे यांच्यावर सोपवली. मितभाषी आयुक्त म्हणून ओळखले जाणारे गमे यांनी दोन वर्षात आपली चमकदार कामगिरी दाखवली. या काळात त्यांना सत्ताधारी वा विरोधकांकडूनही फारसा त्रास झाला नाही. किंबहुना या दोघा घटकांमध्ये योग्य समन्वय साधत त्यांनी प्रशासकीय कामकाज चालू ठेवले. त्यामुळे दोन वर्षात आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयांच्या मुद्यांवरुन फारसे वादंग झाले नाहीत. त्यातच आयुक्तांच्या कार्यकाळात स्वच्छ भारत स्पर्धेत नाशिकने देशात अकराव्या तर राज्यात दुसर्‍या स्थानावर मजल मारली. स्मार्ट सिटीच्या रँकिंगमध्येही नाशिकचा राज्यात पहिला क्रमांक आला आहे. कोरोनाकाळातही नाशिक महापालिकेची कामगिरी समाधानकारक राहिली आहे. पदोन्नतीसाठी गमे यांची वर्णी लागणार असल्याने त्यांच्या बदलीची चर्चा गेल्या १० महिन्यांपासून झडत होती. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून पालकमंत्री छगन भुजबळ हे गमेंच्या कामकाजावर खूष नव्हते, असे कळते. भाजप शासनाच्या काळात गमेंना नाशिकची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे भुजबळ आणि गमेंचे संबंध फारसे सुकर नव्हते. त्यातच गमेंचे नातेसंबंध नाशिकमधील अनेक राजकीय पुढार्‍यांशीही आहेत. हे नातेसंबंधच गमेंच्या बदलीला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. बदली काही दिवस थांबवण्यासाठी गमेेंकडून जोरदार प्रयत्न झाल्याचे कळते. यासाठी त्यांनी भुजबळांचीही भेट घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, ही भेट फोल ठरल्याचे आजच्या बदलीवरुन कळते. दुसरीकडे कैलास जाधव यांचे भुजबळांशी निकटचे संबंध असल्याचे बोलले जाते. या संबंधांतूनच त्यांना नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी काम करण्याची संधी मिळाल्याचे समजते.

कैलास जाधव यांंची नाशिकशी जवळीक

कैलास जाधव यांनी १९९८ मध्ये निफाड प्रांतधिकारी म्हणून कामकाज बघितले. त्यानंतर २००० ते २००४ या कालावधीत ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी कामकाज केले. सिंहस्थ कुंभमेळ्यातही त्यांनी मोठी जबाबदारी निभावली असून त्यांचे दीर्घकाळ कामकाज केल्यामुळे नाशिकमधील राजकीय, तसेच प्रशासकीय वर्तुळात सलोख्याचे संबंध आहेत.

गमेंना विभागीय आयुक्तपदी संधी?

नाशिकचे विद्यमान विभागीय आयुक्त राजाराम माने लवकरच निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागेवर राधाकृष्ण गमे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

First Published on: August 26, 2020 10:12 PM
Exit mobile version