राज्यात १४ ऑगस्टनंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मान्यता नाही

राज्यात १४ ऑगस्टनंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांना मान्यता नाही

कोरोनाची दुसरी लाट कायम असताना संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही एकूण कार्यरत पदांच्या १५ टक्के मर्यादेत सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यास मान्यता दिली आहे. १४ ऑगस्ट २०२१ पर्यंत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करता येतील. मात्र त्यानंतर कोणत्याही बदल्यांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी जारी केलेल्या निर्णयात म्हटले आहे. यामुळे सर्वसामान्य बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

करोनाचा संसर्ग आणि त्याअनुषंगाने घालण्यात आलेले निर्बंध यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. साहजिकच यामुळे बदली भत्त्यावरील खर्च मर्यादित स्वरुपात करण्याच्या दृष्टीने सर्वसाधारण बदल्या या एकूण कार्यरत पदाच्या १५ टक्के एवढ्या मर्यादेत, बदली अधिनियमातील कलम ६ मध्ये नमूद केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने करण्यात याव्यात, असे आदेशात म्हटले आहे.

१५ टक्के मर्यादेनुसार या बदल्या करीत असताना ज्या पात्र अधिकाऱ्यांचा वा कर्मचाऱ्यांचा संबंधित पदावर जास्त कालावधी पूर्ण झाला आहे, अशांना प्राधान्य देण्यता यावे. सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात यावी. त्यानंतर जी पदे रिक्त राहतील, त्याच पदांवर विशेष कारणास्तव १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत बदल्या करण्यात याव्यात, असेही आदेशात नमूद केले आहे.

First Published on: July 9, 2021 11:25 PM
Exit mobile version