शिंदे सरकारकडून राज्यातील 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

शिंदे सरकारकडून राज्यातील 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

आगामी निवडणुका लक्षात घेता शिंदे सरकारने अवघ्या 3 महिन्यांत राज्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या करत प्रशासकीय पातळीवरील भाकरी फिरवली आहे. गुरूवारी आयुक्त, जिल्हाधिकारी, सचिव, प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव अशा तब्बल 44 वरिष्ठ आयएएस अधिकार्‍यांच्या घाउक बदल्या केल्या आहेत. त्यानुसार ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे.

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. तर ठाण्याचे जिल्हाधिकारी म्हणून अशोक शिंगारे यांची नियुक्ती झाली आहे. ठाण्याच्या महापालिका आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती झाली आहे. तर गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर यांची विमानचालन व राज्य उत्पादन शुल्क, सामान्य प्रशासन विभागच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

विकास आयुक्त (उद्योग) मुंबईचे डॉ. हर्षदीप कांबळे यांची उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर यांची प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकार, सामान्य प्रशासन विभागपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण दराडे यांची पर्यावरण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवपदाचा अतिरिक्त कारभारही त्यांच्याकडे असेल.

महाराष्ट्र सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक असलेले ए.आर.काळे यांची मुंबईच्या अन्न व औषध आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास यांची आदिवासी विकास विभागात अप्पर मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटने यांची पुणे झोपडपट्टी प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. राज्य उर्जा निर्मिती मर्या. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांची ठाण्याच्या आदिवासी विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांची महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार देखील भोज यांच्याकडे असेल. आदिवासी विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांची अल्पसंख्यांक विकास विभागाच्या सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.


हेही वाचा – मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना यंदा २२ हजार ५०० रुपये बोनस

First Published on: September 29, 2022 11:17 PM
Exit mobile version