बेळगावात मराठी मुलांवर राजद्रोह, मुंबईत बसून हवेत गोळीबार करु नका, राऊतांनी ठाकरे सरकारला फटकारलं

बेळगावात मराठी मुलांवर राजद्रोह, मुंबईत बसून हवेत गोळीबार करु नका, राऊतांनी ठाकरे सरकारला फटकारलं

कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध करण्यासाठी बेळगावात मराठी तरुणांनी आंदोलन केले. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी या तरुणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला फटकारलं आहे. बेळगावमधील घटना महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने घेतली पाहिजे. मुंबईत बसून उगाच हवेत गोळीबार करु नये, असं संजय राऊत म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली, त्याचा निषेध करण्यासाठी ते रस्त्यावर येऊन आंदोलन केलं. गुन्हे दाखल करु शकता पण त्यांच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला. देशद्रोह…? छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं त्यावर निषेध नोंदवलं म्हणून, त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. हा देशातला एका राज्यात जिथे भाजपचं राज्य आहे, तिथे देशद्रोहासारखा गुन्हा होऊ शकतो. देशद्रोहासारखा गुन्हा इतका स्वस्त झाला आहे का? छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे तुम्हाला माहित नाही का? असे परखड सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केले.

एका बाजूला काशीमध्ये पंतप्रधान शिवरायांच्या शौर्याचा पुरस्कार करतात. त्याच छत्रपतींचा अपमान होतो म्हणून बेळगावला लोकं रस्त्यावर उतरतात. त्यातील ३८ तरुणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु आहे. महाराष्ट्र सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. मुंबईत बसून उगाच हवेत गोळीबार करु नये. उगाच खरमरीत पत्र पण लिहण्याच्या भानगडीत पडू नये. त्याने काही होत नाही. एकतर महाराष्ट्रामध्ये तुम्ही कठोर पावलं उचला आणि हे ३८ तरुण आहेत त्यांना संपूर्णपणे कायदेशीर बाजू मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वकील द्यावा. कायदेशीर बाजू त्यांची राज्य सरकारने सांभाळावी अशी माझी मागणी आहे, असं संजय राऊत म्हणाले.

 

First Published on: December 31, 2021 10:33 AM
Exit mobile version