Coronavirus : करोना सदृश्य वगळता इतर व्याधीवर उपचार करा!

Coronavirus : करोना सदृश्य वगळता इतर व्याधीवर उपचार करा!

प्रवीण परदेशी

मुंबईतील खासगी रुग्णालये, दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब तसेच औषधांची दुकाने बंद ठेवण्यात येत असल्यामुळे महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी यासर्वांना सेवा देण्याचे आदेश बजावले. सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे आढळून आल्यास त्यांना महापालिकेने निश्चित केलेल्या रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी पाठवावे. मात्र, करोना लक्षणे व्यतिरिक्त असणाऱ्या सर्व व्याधींवर आपल्या स्तरावर तपासणी व औषधोपचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहे. मात्र, त्यानंतरही कोणत्याही कारणाशिवाय संबंधित सेवा बंद आढळून आल्यास साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ व भादंस कलम १८८अंतर्गत कायदेशी कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

 

मुंबईतील काही खासगी रुग्णालये, दवाखाने, पॅथोलॉजी लॅब, औषधांची दुकाने या करोना विषाणूच्या संसर्गामुळे पसरलेल्या महामारीच्या प्रसंगी बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या सेवा सुरु होणे हे नागरिकांच्या सार्वजनिक आरेाग्याच्यादृष्टीकोनातून हिताचे असल्यामुळे मुंबईतील या सर्व सेवा पुन्हा नियमित सुरु ठेवाव्यात, असे आदेश महापालिका आयुक्तांनी बजावले आहेत. ताप, खोकला व सर्दी ही लक्षणे असणाऱ्या रुग्णांना करोनाग्रस्त रुग्णांची व्यवस्था करण्यात महापालिकेच्या ७ व खासगी १२ रुग्णालयात तपासणीसाठी पाठवावे. रुग्णालयात प्रवेश देण्यापूर्वी त्यांची बाह्यविभागात तपासणी करावी व त्यांना ताप, सर्दी व खोकला ही लक्षणे नसल्यासच दवाखाने तसेच रुग्णालयात प्रवेश द्यावा, असेही यात म्हटले आहे.

महाराष्ट्र शासनाने करोना विषाणुने उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी यासाठी महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२० यातील नियम ३नुसार शहरी भागात महापालिका आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. आणि त्यांना कार्यक्षेत्रातील करोनावर नियंत्रण आणण्यासाठी व तचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहेत, त्या करण्यासाठी ते सक्षम असतील, असे जाहीर केले आहे. त्यानुसार आयुक्तांनी हे आदेश बजावताना, करोना विषाणूसदृश्य लक्षणे व्यतिरिक्त असणाऱ्या सर्व व्याधींवर आपण आपल्या स्तराव तपासणी व औषधोपचार करावेत, असे निर्देश दिले आहेत. मात्र, कोणतेही सबळ कारणाशिवाय या सेवा संबंधितांनी बंद ठेवल्याचे आढळल्यास ते कायदेशीर कारवाईस पात्र ठरतील, असेही नमुद केले आहे.

First Published on: April 3, 2020 12:09 AM
Exit mobile version