वारे येथे बेसुमार जंगलतोड

वारे येथे बेसुमार जंगलतोड

Deforestation

तालुक्यातील वारे भागातील जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असून, किमान 15 एकर जागेतील जुनी झाडे तोडण्यात येत आहेत. वन विभागाने परवानगी दिली असल्याचे झाडे तोडणार्‍या स्थानिक कामगारांनी सांगितले असले तरी जंगलातील मौल्यवान समजली जाणारी खैर आणि सागवान जातीच्या झाडांची देखील तोड मोठ्या प्रमाणत झाली असताना वन विभाग सुस्त असल्याचे दिसून येत आहे.

वारे गावाच्या हद्दीत देवपाडा रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगलात मोठ्या प्रमाणात वन संपदा टिकून होती. त्या भागातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात आणि घनदाट असलेल्या जंगलातून जा-ये करण्यास वाहनचालक कचरतात. मात्र आता रात्रीची भीती काही प्रमाणात कमी करण्याचे काम शेकडो झाडे तोडून केली गेली आहे. वारे गावातील शेतकर्‍यांची मालकी आणि राखून ठेवलेले जंगल सध्या तोडले जात आहे. किमान 15 एकर परिसरातील म्हणजे वारे-देवपाडा रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगलातील झाडे तोडण्यात येत आहेत. झाडांची पाहणी केली असता त्यात प्रामुख्याने सागवान आणि खैर या जातीच्या झाडांची तोड करण्यात आली आहे.

याबाबत स्थानिक कामगारांना माहिती विचारली असता वन विभागाने परवानगी दिली आहे असे उत्तर दिले. मात्र सागाची झाडे तोडायला परवानगी दिली आहे काय, याचे उत्तर कामगारांनी दिले नाही. दुसरीकडे कर्जत वन विभागाच्या सुगवे वन क्षेत्रामधील वनपाल यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेण्याचा प्रयत्न केला असता तेथे वन विभागाचे कोणीही कर्मचारी हजर नव्हते. दरम्यान, वन विभागाने टाकाऊ झाडे तोडण्यास परवानगी दिली असल्याचे बोलले जात असून, जंगलतोड करणारे मात्र सरसकट जागेत उपलब्ध असलेली झाडे तोडून टाकत आहेत.त्यातून सागवान आणि खैर यासारख्या मौल्यवान झाडांच्या लाकडांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठेमध्ये किंमत असल्याने त्या झाडांवर ठेकेदारांचा डोळा असतो आणि वारे येथे देखील तसाच प्रकार सुरू आहे. परंतु वन विभाग त्याबाबत उदासीन असल्याचे दिसून येत असून, वन विभागाचे कर्मचारी जंगलतोडीबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देत नाहीत. त्यामुळे जंगलतोड बेकायदा सुरू असल्याचा संशय निर्माण होत आहे.

या संदर्भात पोही येथील वन विभागाच्या कार्यालयातील वनपाल रंगराव राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, येथील लाकडाचा व्यवसाय करणार्‍यांनी आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून वृक्ष तोडण्याची परवानगी घेतली आहे. आम्ही पंचनामा केला आहे. परवानगी देण्याचा आमचा अधिकार नाही. तसेच केलेला पंचनामा ही त्या व्यावसायिकाकडे देण्यात आला आहे.

First Published on: April 8, 2019 5:05 AM
Exit mobile version