पालघर जिल्ह्यातील भूकंपग्रस्त नागरिकांनी सहकार्य करावे – विष्णू सवरा

पालघर जिल्ह्यातील भूकंपग्रस्त नागरिकांनी सहकार्य करावे – विष्णू सवरा

प्रातिनिधिक फोटो

पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी आदी भूकंपप्रवण भागातील नागरिकांनी भूकंपामुळे घाबरुन जावू नये. प्रशासन आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर असून आपत्कालीन स्थितीत प्रशासनास योग्य सहकार्य करावे, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केले.

नागरिकांमध्ये भिती 

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पालघर जिल्ह्यातील भूकंपसंदर्भातील बैठकीत ते बोलत होते. श्री. सवरा म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून पालघर तलासरी भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहे. त्यामुळे तेथील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. आश्रमशाळेतील विद्यार्थी देखील भयभीत झाले आहे. नागरिकांनी अजिबात घाबरुन जाऊ नये. या परिस्थितीत प्रशासन अत्यंत चांगले काम करीत आहे. शासनाने देखील भूकंपसंदर्भात गंभीर दखल घेतली असून सावधानतेबाबत काळजी घेण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. भूकंपासंदर्भातील विविध तज्ज्ञांना बोलावून त्यांच्याकडून सावधानतेबाबत काय दक्षता घ्यावी याची माहिती घेतली जात आहे. त्यानुसार शासनाच्यावतीने उपाययोजना केल्या जातील. भूकंपग्रस्त भागात जनजागृती करुन लोकांच्या मनातील भीती दूर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी यावेळी संगणकीय सादरीकरणाद्वारे प्रशासनाच्यावतीने केलेल्या व करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने जनजागृती शिबिरे, प्रसारमाध्यमांद्वारे जागृती, तात्पुरती निवास व्यवस्था, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था, सतर्कतेच्या सूचना, महावितरण, पोलीस, नागरी सुरक्षा दल, राष्ट्रीय आपती निवारण दल आदी विभागांनी करावयाची कामे तसेच पालघर जिल्ह्यातील मोठे प्रकल्प गेल, भाभा, तारापूर, रिलांयन्स, जलप्रकल्प यांनी घ्यावयाची काळजी, भूकंपग्रस्त गावातील घरांचे सर्वेक्षण, सावधगिरीसंदर्भात सूचना, आसपासच्या भागातील रुग्णालये, वाहतूक, रस्ते आदींबाबत घेतली गेलेली दक्षता याची सविस्तर माहिती दिली. प्रशासन पूर्णपणे दक्षता घेत असून तज्ज्ञांच्या मदतीने सावधगिरीच्या उपाययोजना करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थांनी केले मार्गदर्शन

आयआयटी, मुंबईचे भूकंप तज्ज्ञ प्रा. डॉ. रवी सिन्हा तसेच डी. श्रीनागेश, हवामान अंदाज विभागाचे अधिकारी यांनी भूकंपासंदर्भात आपले अनुभव सांगून उपाययोजनाबाबत मार्गदर्शन केले. या परिसरातील भूकंप हा स्वॉर्म (Swarms) सौम्य कंपनाची शृंखला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे दक्षता घेणे आवश्यक असून पालघर येथे कायमस्वरुपी भूमापन केंद्र स्थापन करण्याबाबत कार्यवाही करण्याचे सूचित केले.

First Published on: February 4, 2019 8:44 PM
Exit mobile version