त्र्यंबकरोडला ३०० लॉजिंगचा विळखा; शाळकरी मुले-मुलीही करतात वापर

त्र्यंबकरोडला ३०० लॉजिंगचा विळखा; शाळकरी मुले-मुलीही करतात वापर

त्र्यंबकरोडवरील लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायामुळे एक मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. या लॉजिंगचा गैरवापर शाळकरी विद्यार्थ्यांपासून प्रौढांपर्यंत केला जातो. या लॉजिंगमुळे परिसरातील शाळा, महाविद्यालयातील मुलींनाही मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर ‘आपलं महानगर’ आजपासून ‘अनैतिकतेचे लॉजिंग’ मालिका सुरू करत आहे. यासंदर्भातील आपल्या प्रतिक्रिया ९०२२५५७३२६ या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर पाठवाव्यात.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर तीर्थस्थानाकडे जाणार्‍या रस्त्यात सध्या ३०० लॉजिंग सुरू आहेत. यातील बहुसंख्य लॉजिंग अनधिकृत आहेत. काही लॉजिंगवर अनैतिक व्यवसाय सुरू असतोच; शिवाय शाळकरी मुलेदेखील या लॉजिंगचा वापर अनैतिक बाबींसाठी करत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. अत्यल्प दरात अगदी तासाभरासाठीही सहजरित्या लॉजिंग उपलब्ध होत असल्याने अनैतिक संबंधांसाठी अनेक जोडपी या ठिकाणी येतात. परिणामी त्र्यंबकेश्वरच्या धार्मिकतेला गालबोट लागत आहे.

१२ ज्योतिर्लिंगांमध्ये महत्त्वाचे मानले जाणारे तीर्थक्षेत्र म्हणून त्र्यंबकेश्वराची ओळख आहे. जगभरातील भाविक त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी येत असतात. कुंभमेळ्याच्यादृष्टीनेदेखील महत्त्वाचे स्थान असल्याने त्र्यंबकेश्वरला विशेष महत्त्व आहे. असे असताना त्र्यंबकरोडवरील अनधिकृत लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे त्र्यंबकरोड बदनाम होत आहे.
भाविकांच्या राहण्याच्या सोयीकरिता लॉजिंग बांधल्याचा बनाव करत अनेक लॉजमालकांनी अनैतिक व्यवसाय सुरू केल्याचे वास्तव समोर आले आहे. कमी कालावधीत भरपूर पैसा मिळत असल्याने या परिसरात लॉजिंगची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकट्या त्र्यंबकरोडवर आणि आजूबाजूच्या परिसरात तब्बल ३०० हून अधिक लॉजिंग असून, अगदी डोंगराच्याआड बाजूला कानाकोपर्‍यातसुद्धा लॉजिंग बांधल्याचे दिसून येत आहे. या लॉजिंगच्या बांधकामाची रचना अगदीच संशयास्पद असल्याने येथे सुरू असलेले गैरप्रकार सर्वसामान्यांच्या अगदी सहजपणे लक्षात येत नाही.
सर्वात गंभीर बाब म्हणजे त्र्यंबक रस्त्यावरील शाळकरी मुलामुलींना लॉजिंग अगदी सहजतेने उपलब्ध होतात. परिणामी या ठिकाणी अल्पवयीन विद्यार्थ्यांचा वावर वाढलेला दिसतो. त्यामुळे परिसरातील पालकांची चिंता अधिक वाढली आहे. त्र्यंबक रस्त्यावर शाळा-महाविद्यालयांची संख्याही मोठी आहे. या महाविद्यालयांमध्ये देश-विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी आलेले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी शिक्षणाच्या नावाखाली चंगळवाद करत असून, विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळेदेखील लॉजिंग वाढल्याचे बोलले जात आहे. ज्या यंत्रणेने यावर नियंत्रण ठेवायचे आहे त्यातील काही जणांची या व्यवसायात छुपी भागीदारी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

तक्रारदारांना दमदाटी

  • त्र्यंबक रस्त्यावरील लॉजिंगमधील गैरप्रकार थांबावेत, यासाठी त्र्यंबक परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी व आंदोलने केली. मात्र, या नागरिकांना काही लॉजधारकांकडून दमदाटी करण्यात आली. तसेच, जीवे मारण्याच्या धमक्यादेखील दिल्या जात आहेत. त्यामुळे लॉजचालकांविरोधात आवाज उठवण्यास कोणीही धजावत नाही.

धार्मिक नगरी नाशिक ते पवित्र ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या मार्गावर काही महाविद्यालये आहेत. या मार्गावर परराज्य, गाव, शहरांतून नाशिक तसेच त्र्यंबकेश्वरला येणार्‍या भाविकांची संख्या मोठी असते. शिक्षणासाठी येणार्‍या मुला-मुलींचीदेखील संख्या अधिक आहे. गेल्या काही वर्षांत या मार्गावर अनेक लॉज तयार झाले. यांचा वापर भाविक-भक्तांपेक्षा अधिक अनैतिक कृत्यांसाठी होताना दिसत आहे. त्यामुळे या शहरांची धार्मिक ओळख या अनैतिक धंद्यांमुळे धोक्यात आली आहे. प्रशासनाने यावर त्वरीत कारवाई करावी आणि या मार्गाचे पावित्र्य जपावे.

– श्रीकांत क्षत्रिय,संयोजक, बजरंग दल

त्र्यंबकेश्वरी महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असून, संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांचे समाधी मंदिरदेखील त्र्यंबकेश्वरमध्येच आहे. त्यामुळे देश-विदेशातील भाविकांबरोबरच वारकरीदेखील मोठ्या प्रमाणावर त्र्यंबकला येत असतात. त्र्यंबक रस्त्यालगत असलेल्या काही लॉजिंगमध्ये गैरप्रकार सुरू आहेत. हे प्रकार तातडीने थांबवावेत.
– अ‍ॅड. सोमनाथ घोटेकर, विश्वस्त, श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज मंदिर
त्र्यंबकरोडवरील लॉजमध्ये शाळकरी मुलींचे येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ती गंभीर बाब आहे. स्थानिक महिला आणि मुलींना शिट्या वाजवून बोलावले जाते. लॉजमधील गैरप्रकार वाढले आहेत. त्यामुळे त्रंबकेश्वरचे महत्व कमी झाले आहे. त्र्यंबक परिसरातील महिला आणि पुरुषांकडे संशयाने पाहिले जाते. महिरावणीमध्ये सर्वाधिक लॉज आहेत. याबाबत पोलीस तक्रार घेत नाहीत. काही लाजवर तर दारूदेखील उपलब्ध करून दिली जाते.
– भाऊसाहेब खांडबहाले, उपसभापती, कृऊबा नाशिक
First Published on: April 9, 2024 2:48 PM
Exit mobile version