Maharashtra Lockdown: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाअंतर्गतच वेगळे मतप्रवाह

Maharashtra Lockdown: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाअंतर्गतच वेगळे मतप्रवाह

Maharashtra Lockdown: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाअंतर्गतच वेगळे मतप्रवाह

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या चर्चेला सुरुवात झाली आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी बैठक घेतली होती. राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स आणि इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान आता राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन विचारधारा असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी लॉकडाऊनला विरोध केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची लॉकडाऊन संदर्भात वेगळीच विचारधारा आहे.

काय म्हणाले होते नवाब मलिक?

लॉकडाऊनला विरोध करत राज्याला आणि जनतेला तो न परवडणारा आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक या व्यक्त केले आहेत. तसेच लॉकडाऊन हा अंतिम पर्याय नाही, असे देखील ते म्हणाले. ‘राज्यात कोरोनाची संख्या वाढत चालली आहे. एका दिवसात ४० हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. निश्चितच लॉकडाऊन हा राज्याला आणि जनतेला कोणालाच परवडणारा नाही आहे. मुख्यमंत्र्यांकडे लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचा आम्ही सर्वांनी आग्रह धरला आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला लॉकडाऊनची तयारी करण्यास सांगितले आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की, लॉकडाऊन अपरिहार्य आहे. जर नागरिकांनी नियमांचे पालन केले तर लॉकडाऊन टाळता येईल,’ असे नवाब मलिक म्हणाले.

राष्ट्रवादीचा लॉकडाऊनला विरोध नाही – जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, ‘राष्ट्रवादीचा लॉकडाऊनला विरोध नाही आहे. मागच्यापेक्षा कितीतरी वेगाने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, हे संकट मोठे आहे आणि लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्याचे किती नुकसान होते याची जाणीव सरकारला आहे. त्याचा मध्य काढण्याचा प्रयत्न होणार आहे. सर्व व्यवहार सुरळीत चालू राहिले पाहिजे, दैनंदिन काम चालू झाली पाहिजे, पण गर्दी होता कामा नये. गर्दीमुळे या कोरोनाचा फैलाव वेगाने होतोय, असा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे योग्य पद्धतीचे निर्णय होतील. जेणेकरून सर्वसामान्य माणसाला त्याचा फटका बसणार नाही.’

पुढे जयंत पाटील म्हणाले की, ‘मुख्यमंत्री काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाला विश्वासात घेऊन योग्य निर्णय घेत आहेत. आमच्या तिघांमध्ये भांडण लावण्याचा उद्योग करण्याचा उपद्व्याप चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करू नये.’ नवाब मलिक यांच्या वक्तव्याविषयी विचारल्यास पाटील म्हणाले की, ‘पक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांशी बोलत असताना बाहेर एखाद्याच्या प्रश्नाला कोणी उत्तर दिले, तर पक्षाचा त्या प्रश्नाला असणारे उत्तर असेल. पण मुख्यमंत्री आमच्या दोन्ही पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेत असतील, तर त्याला कोणी कोणाला विरोध करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.’

नियम पाळा, लॉकडाऊन टाळा – टोपे

‘लॉकडाऊन कुणालाच मान्य नाही, प्रिय नाही पण परिस्थिती पाहता निर्णय घ्यावा लागतो. लॉकडाऊन अचानक लावता येत नाही, त्याचा अभ्यास करावा लागतो. पण सध्या निर्बंध कडक करण्याचा सूचना देण्यात आलेल्या आहेत. जेव्हा कोरोना रुग्णांपेक्षा बेड्सची संख्या कमी असेल. त्यावेळेस शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनचा पर्याय निवडावा लागतो,’ असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.


हेही वाचा -व ठाकरे सरकारचा सर्व खासगी हॉस्पिटलना इशारा! अन्यथा हॉस्पिटल्स ताब्यात घेणार, मेस्माही लावणार


 

First Published on: March 30, 2021 12:40 PM
Exit mobile version