महाराष्ट्रात उष्माघाताचे दोन बळी, स्वाईन फ्लूही बळावतोय

महाराष्ट्रात उष्माघाताचे दोन बळी, स्वाईन फ्लूही बळावतोय

राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका वाढतो आहे. राज्यात मार्च महिन्याच्या पंधरवड्यापासून आतापर्यंत उष्माघातामुळे दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. तर, अनेक ठिकाणांमधील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत एकूण उष्माघाताच्या ८८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. औरंगाबाद आणि धुळे प्रत्येकी एक मृत्यू नोंदवण्यात आला आहे. अनेकदा एप्रिल-मे महिन्यात उन्हाचा तडाखा वाढतो. पण, यावर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पाऱ्याने विक्रमी उंची गाठली आहे. त्यामुळे, येत्या काही काळात उष्माघातापासून वाचण्यासाठी प्रत्येकाला सतर्क आणि काळजी घेणं गरजेचं आहे. कारण, क्षेत्रीय हवामान विभागाने पुढचे काही दिवस तापमानाचा पारा असाच राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

नागपूरमध्ये सर्वाधिक उष्माघाताच्या रुग्णांची नोंद

नागपूरमधून सर्वात जास्त ६७ उष्माघाताच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल अकोल्यात १२ , लातूर ६, औरंगाबाद २ आणि नाशिकमध्ये एका रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात १५ मार्चेपासून आतापर्यंत ८८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसंच, उष्माघातामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. धुळे आणि औरंगाबादमधील हे मृत्यू आहेत. यात सर्वात जास्त नागपूरमध्ये ६७ रुग्ण आढळले आहेत ज्यांना उष्माघाताचा त्रास झाला आहे.
– डॉ. प्रदीप आवटे, सर्वेक्षण अधिकारी

हिट स्ट्रोकपासून कसा बचाव कराल ?

सध्या राज्यात ४० ते ४५ अंश सेल्सिअस एवढं तापमान आहे. त्यामुळे, शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. त्यातून अशक्तपणा वाटणं, किंवा त्याचा परिणाम किडनी आणि मेंदूवर होतो. तसंच, व्यक्ती कोमामध्ये जाऊ शकते. त्यामुळे, लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच बाहेर पडताना काळ्या कपड्यांचा वापर टाळावा. सुती आणि हलके कपडे वापरावे, जास्तीत जास्त पाणी प्यायलं पाहिजे. उन्हात काम करणाऱ्यांनी संध्याकाळी काम केलं पाहिजे. डोक्यावर रुमाल, छत्रीचा वापर करावा. चहा , कॉफीचे सेवन टाळावे, नारळ पाणी, लिंबू पाण्याचे जास्तीत जास्त सेवन करावे. जास्त डिहायड्रेशन झालं असेल तर हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार सुरु करावेत.
– डॉ. मधुकर गायकवाड, जनरल फिजिशियन

स्वाईन फ्लूचं सावट कायम

महाराष्ट्रावर स्वाईन फ्लूचं ही सावट कायम आहे. गेल्या तीन महिन्यांपासून आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १२५० जणांची वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये नोंद करण्यात आली होती. त्यातील ९०४ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या हॉस्पिटलमध्ये २४५ जणांवर उपचार सुरू आहेत.

First Published on: April 15, 2019 7:27 AM
Exit mobile version