वाड्यातील एका कुटुंबाला महागात पडली लगीनवारी

वाड्यातील एका कुटुंबाला महागात पडली लगीनवारी

कोरोनाची साथ रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळे, उत्सव यांच्यावर कडक निर्बंध घातले जात असतानाही काही नागरिक शासनाचे निर्बंध धुडकावून सोहळे साजरे करताना दिसून येत आहेत. वाडा शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या डाहे अंबातपाडा येथील एक कुटुंबाला जळगाव येथील लग्नाची वारी चांगलीच महागात पडली आहे. या लग्नवारीत सहभागी झालेल्या वधुपित्यालाच त्याच्या मित्रासह कोरोनाची लागण झाल्याने जीव गमवावा लागला आहे.

वाडा तालुक्यातील मौजे डाहे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील आंबात पाडा येथील एका युवतीचे वाडा शहरात व्यवसायासाठी आलेल्या जळगाव येथील एका युवकाशी प्रेमसंबंध जुळले. दोघांच्या घरच्यांनी लग्नासाठी परवानगी दिली. मात्र लग्न जळगाव येथेच होणार अशी अट वरपित्याने घातल्याने वधुपित्याला जळगाव येथे लग्नवारी करावी लागली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंध घातले असतानाही डाहे आंबातपाडा येथील संतोष भुवर हा वधुपिता हे ८ एप्रिल रोजी वाडा येथून चारशे किलोमीटर लांब अंतरावर असलेल्या जळगाव येथे एका प्रवासी वाहनाने २२ वर्‍हाडी मंडळींना घेऊन उपस्थित होते.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून जळगाव शहर करोनाचे हॉटस्पॉट बनलेले असतानाही दोनशेहून अधिक जणांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडला.

लग्न सोहळ्यानंतर डाहे येथे पोहोचल्यावर वधुपिता संतोष भुवरसह काही जणांना अंगदुखी, अशक्तपणा असा त्रास जाणवू लागला. मात्र लांब अंतराच्या प्रवासाचा हा त्रास असेल असे समजून तब्बल आठ दिवस त्यांनी हा त्रास अंगावरच काढला. त्यानंतर मात्र हा त्रास असह्य झाल्याने सर्वजण रुग्णालयात दाखल झाले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलेल्या वधुपिता संतोष भुवर (४६) यांचा सोमवार, १९ एप्रिलला संध्याकाळी मृत्यू झाला. तर याच लग्नवारीत सहभागी झालेले संजय सालकर (३८) याचा मंगळवारी, २० एप्रिलला मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेनंतर डाहे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील प्रत्येकाने तातडीने अँटेजिन तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बुधवारी येथील एकही व्यक्ती तपासणी करण्यासाठी रुग्णालयात हजर झाली नसल्याने आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी प्रत्यक्ष भुवर कुटुंबियांच्या घरी जाऊन कोरोना तपासणीचे नमुने घेतले आहेत. गुरुवारी गावात आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी जाऊन प्रत्येकाची अँटीजेन तपासणी केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बुरपुल्ले यांनी दिली.

First Published on: April 23, 2021 4:15 AM
Exit mobile version