सोलापुरात मराठा मोर्चादरम्यान बस फोडल्या!

सोलापुरात मराठा मोर्चादरम्यान बस फोडल्या!

प्रातिनिधिक फोटो

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (शनिवारी) सोलापूरच्या शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून आंदोलनकर्त्यांनी दोन एसटी गाड्या फोडल्या आहेत. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे मराठा समाजाने हे आंदोलन केले आहे. या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करण्यात आला आहे.

कार्यकर्त्यांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले

आंदोलनकर्त्यांनी दोन एसटी गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली आहे. मुंबईमध्ये मराठा मूक मोर्चाची सांगता झाली होती. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु एक वर्ष झाल्यानंतरही मराठा समाजाच्या मागण्यांची पूर्तता झालेला नाही. त्यामुळे या विरोधात मराठा समाजाने मूक मोर्चानंतर आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. शिवाय, सध्या नागपूरमध्ये पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात मराठा मोर्चाच्या मागण्यांवर चर्चा करून लवकरात लवकर कायद्यात रुपांतर करावे, असे आंदोलकांचे मत आहे.

काय आहेत मागण्या?

मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मराठा विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्कात ५० टक्के सवलती मिळाव्यात, शिवाय जे महाविद्यालय सवलती देत नसतील त्यांच्या विरोधात कारवाई करून त्यांची मान्यता रद्द करावी, सरकारी नोकऱ्यांमध्ये घोषित केलेले आरक्षण लागू करावे, अशा मागण्या मराठा समाजाकडून करण्यात आल्या आहेत. मात्र, सरकारचे धोरण याबाबतीत उदासीन दिसत आहे. त्यामुळे मराठा समाज पुन्हा आंदोलनाला उभा राहिला आहे.

First Published on: July 21, 2018 6:25 PM
Exit mobile version