Corona Effect : रायगडमध्ये मध्यरात्रीपासून दुचाकी चालवण्यासही बंदी!

Corona Effect : रायगडमध्ये मध्यरात्रीपासून दुचाकी चालवण्यासही बंदी!

राज्यात पसरत असलेल्या कोरोना संसर्गाच्या साथीचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने रायगड जिल्ह्यात आजपासून चार चाकी वाहनांसह गल्लीबोळात चालणाऱ्या दुचाकी वाहनांवर देखील पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग राज्यात कमी होता होईना. या संसर्गाची लागण झालेले असंख्य रुग्ण रोज रुग्णालयात दाखल होत आहेत. रायगड जिल्ह्यात आत्तापर्यंत सापडलेल्या रुग्णांपैकी पाच जण पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून निगराणीखाली असलेल्या बहुतांशी रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे. या साथीची लागण आणखी पसरू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने खंबीर उपाय सुरू केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशांनुसार पूर्ण देश लॉकआऊट झाला आहे.

तात्काळ अंमलबजावणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात संसर्गाची लागण वाढू नये यासाठी प्रशासन कार्यरत झाले आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी त्यांच्या नियंत्रणातील सर्व तालुक्यांमध्ये २८ तारखेपासून चार चाकी तसेच रिक्षा वाहतुकीवर पूर्णतः निर्बंध आणले आहेत. कोणतेही खाजगी वाहन रस्त्यावर येणार नाही, अशा खबरदारीच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या आहेत. तथापि अनेक गल्लीबोळात दुचाकी वाहने आजही फिरताना आढळल्याने आणि बहुतांश दुचाकींवर बघे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत असल्याची माहिती समाज माध्यमातून मिळाल्यावर चौधरी यांनी गल्लीबोळात धावणाऱ्या दुचाकी वाहनांवरही आज पासून पुढील आदेश मिळेपर्यंत बंदी घालण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशांनुसार त्यांनी जिल्हा दंडाधिकारी या अधिकाराने तात्काळ अमलबजावणीच्या सूचना तालुका दंडाधिकारी, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि रायगडच्या पोलिस अधीक्षकांना दिल्या आहेत.

First Published on: March 29, 2020 11:04 PM
Exit mobile version