शाळा, कॉलेज बंद असतील तर परीक्षा कशा घ्यायच्या?

शाळा, कॉलेज बंद असतील तर परीक्षा कशा घ्यायच्या?

केंद्र सरकारने शनिवारी सायंकाळी अनलॉकचा चौथा टप्पा जाहीर केला असून नवीन नियमावली जारी केली आहे. यामध्ये ३० सप्टेंबपर्यंत शाळा आणि महाविद्यालये बंदच राहणार आहेत. यावरुन आता राज्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परिक्षा कशा घ्यायच्या असा सवाल केंद्र सरकार आणि यूजीसीला केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा घ्याव्याच लागतील असे निर्देश दिले होते.

राज्य अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता पदवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करू शकत नाहीत, असा निकाल देत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने अंतिम वर्षाच्या परिक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता. पण युजीसी परिक्षा घेण्यावर ठाम असल्यामुळे हे प्रकरण कोर्टात गेले. दरम्यान, न्यायालयाने परीक्षा घ्याव्याच लागतील असा आदेश दिल्यानंतर राज्य सराकरने तशी तयारीही दर्शवली आहे. मात्र, शनिवारी अनलॉकचा चौथा टप्पा जाहीर केला असून ३० सप्टेंबरपर्यंत शाळा बंद ठेवाव्यात असा आदेश काढण्यात आला. राज्याचे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावरुन केंद्रावर निशाणा साधला आहे.

उदय सामंत यांनी ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे. “केंद्र सरकार म्हणते ३० तारखेपर्यंत शाळा व महाविद्यालय लॉकडाऊनमुळे बंद राहणार. यूजीसी म्हणते ३० सप्टेंबरपर्यंत परीक्षा घ्या. राज्य सरकारने आणि विद्यार्थ्यांनी नक्की करायचं काय? ३० सप्टेंबर पर्यंत शाळा कॉलेज बंद असतील तर परीक्षा घ्यायच्या कशा?” असा सवाल उदय सामंत यांनी केला आहे.

First Published on: August 30, 2020 4:45 PM
Exit mobile version