मनाला पटेल तोच निर्णय घेईन – उदयनराजे भोसले

मनाला पटेल तोच निर्णय घेईन – उदयनराजे भोसले

उदयनराजेंचा पराभव

मागील काही दिवसांपासून खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण आता याबाबत खुद्द उदयनराजे भोसले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ”भाजप प्रवेशाबाबत माझ्या मनाला पटेल तोच निर्णय घेईन,” असे त्यांनी सांगितले. तसेच ”रामराजे आणि शिवेंद्रराजे ही मोठी माणसं असून त्यांच्याशी माझी बरोबरी करू नका,” असेही उदयनराजेंनी म्हटले. साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांना भाजप प्रवेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

पत्रकारांच्या प्रश्नांवर उदयनराजेंची उत्तरे

रामराजे आणि तुम्ही एकाच दिवशी भाजप प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या असल्याचे पत्रकारांनी विचारताच उदयनराजे म्हणाले की, ”रामराजे हे राजे असून माझ्यापेक्षा वयाने आणि मानाने मोठे आहेत. त्यांच्याबाबत मी काही बोलणार नाही. तसेच तुम्ही त्यांच्याशी मला जोडू नका,” असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. त्याचप्रमाणे शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे कोणत्याही पक्षात असले तरी मला मदत करणार असे वक्तव्य केले होते. त्यावरही पत्रकारांनी उदयनराजेंना विचारले असता ते म्हणाले की, ”लहान भावाला मदत केलीच पाहिजे असे म्हणत लहान मुलाने मांडीवर एखादी गोष्ट केली म्हणून आपण मांडी कापून टाकत नाही. शिवेंद्रराजे तर माझे लाडके बंधू आहेत. त्यामुळे त्यांना मदत करणारच”, असे उदयनराजेंनी सांगितले. ‘शिवस्वराज्य यात्रे’चे साताऱ्यात येण्याबाबत विचारले असता, सगळ्याच्या यात्रा असतात पण आमची तर जत्रा आहे, असे खोचक उत्तर त्यांनी पत्रकारांना दिले.

हेही वाचा – २४ ऑगस्टला राहुल गांधी काश्मीर दौऱ्यावर

मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे हे कारण

काही दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. पण त्या भेटीमागचे कारणदेखील उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे. ”केवळ विकासकामांसाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली,” असे त्यांनी सांगितले.

First Published on: August 23, 2019 9:41 PM
Exit mobile version