‘या’ निमित्ताने उद्धव ठाकरे- प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर; राजकीय समीकरणं बदलणार?

‘या’ निमित्ताने उद्धव ठाकरे- प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर; राजकीय समीकरणं बदलणार?

राज्यात शिंदे गटाने भाजपशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केल्याने उद्धव ठाकरे सरकार कोसळले, या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकारण मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटासह महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी आक्रमक झाले असून त्यांनी जनाधार वाढण्यावर भर दिला आहे. या माध्यमातून शिंदे फडणवीस सरकारल घेरण्याचा प्रयत्न केला जातोय.

अशात शिंदे आणि ठाकरे गट आपल्यासोबत विविध नेते आणि संघटनांना घेऊन जाण्यावर भर देत आहेत. यात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नावंही चर्चेत आलं आहे. प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आणि विचार वाचकांपर्यत पोहचविणाऱ्या ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या वेबसाईटच्या लोकार्पणाच्या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर रविवारी एकाच मंचावर दिसणार आहेत. या निमित्ताने राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अलीकडेच प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेत सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंवर अन्याय झाल्याची भूमिका घेतली होती. यानंतर आंबेडकरांच्या पत्रकार परिषदेतील मुद्द्यांबाबत शिवसेनेचे मुखपत्र सामान अग्रलेखातून आभार मानण्यात आले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंची प्रकाश आंबेडकरांसोबतची राजकीय जवळीक वाढत असल्याचे म्हटले जातेय. यात आता हे दोन्ही नेते एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकाच मंचावर येणार असल्याने राज्यात पुन्हा नवी समीकरणं जुळणार की काय? असा चर्चांना उधाण आले आहे.

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार असल्याची माहिती असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ पाहणीच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली.

मात्र दोघांनी ही भेट राजकीय नसल्याचे स्पष्ट केले, यावेळी प्रकाश आंबेडकरांनी देखील आपण भाजप किंवा भाजपच्या जवळ असलेल्या पक्षांसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले, या पार्श्वभूमीवर रविवारीच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांसह बंडखोरी तर भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर आपणचं खरी शिवसेना पक्ष असल्याचा दावा केला. पक्षातील या फुटीमुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरत ठाकरे गट नव्या राजकीय मित्र पक्षांना आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करत आहे. यातून वंचित बहुजन आघाडीचा पर्याय समोर आला आहे.

ठाकरे गटाला पक्ष फुटीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात मोठा फटका बसला आहे. या दोन्ही भागात प्रकाश आंबेडकरांची निर्णायक ताकद आहे. त्यामुळे वंचित आघाडीसोबत गेल्याने दोघांनाही राजकीय फायदा मिळू शकतो. नजीकच्या काळात उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरु होणार की नाही याचे संकेत मिळू शकतात. यामुळे आजच्या कार्यक्रमाकडे आता शिवसैनिक आणि वंचितच्या कार्यकर्त्यांचं लक्ष आहे. या कार्यक्रमाला दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते गर्दी करण्याची शक्यता आहे. ‘ प्रबोधनकार डॉट कॉम’चा लोकार्पणाचा सोहळा संध्याकाळी साडेसात वाजता दादर पश्चिम येथील शिवाजी मंदिर येथे होत आहे. या कार्यक्रमाला प्रबोधन प्रकाशनाचे सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत.

शिवसेना नेमकी कोणाची हा वाद जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला, त्यावेळी देखील प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या बाजूने भूमिका घेतली होती. यावेळी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाबाबतची भूमिका मांडली होती.

बेकायदेशीर सरकारबाबत कालमर्यादेत निर्णय होणे आवश्यक आहे. पण इथे सध्याचे सरकार व त्यात सामील झालेल्या बेइमान गटास संरक्षण कसे मिळेल या दृष्टीने काही तरी घडविले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हा भारतीय घटनेचा खून आहे. त्या खुनाला वाचा फोडण्याचे काम घटनाकारांचे वारसदार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच, अशा शब्दात शिवसेनेने या अग्रलेखातून कौतुक केले आहे.


भाजपाकडून शिवरायांचा अपमान, शिंदे – फडणवीस सरकारने राजीनामा द्यावा; राऊतांची मागणी

First Published on: November 20, 2022 12:42 PM
Exit mobile version