जनतेच्या जीवाशी खेळू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजकीय पक्षांना आवाहन

जनतेच्या जीवाशी खेळू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजकीय पक्षांना आवाहन

ठाकरे सरकारची कलावंतांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत

राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्य जनतेच्या अडचणी वाढवणारी, त्यांचे आरोग्य धोक्यात आणणारी तर नाही ना याचा विचार राजकारण्यांसह सर्वांनीच करायला हवा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं; पण जीव जनतेचा जातो, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेच्या जीवाशी खेळू नका, आंदोलन करायचे तर कोरोना विरुद्ध करा, असे आवाहन राजकीय पक्षांना केले.

आपण ज्या गोष्टी उघडत आहोत त्या पुन्हा बंद होऊ नयेत याची काळजी घेण्याचीही गरज आहे. ती घेतली नाही तर आपण या कोरोनाच्या संकटातून कधीच बाहेर पडणार नाही. यामुळे कोरोना सदैव आपल्यासोबत राहण्याची शक्यता वाढू शकते, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

विरोधी पक्ष भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन चालवले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत राज्य कृती दलाने आयोजित केलेल्या ‘माझा डॉक्टर’ या ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन करताना ठाकरे विरोधी पक्षाच्या मागणीचा समाचार घेतला. त्याचवेळी आपल्याला तिसरी लाट येऊ द्यायची नाहीच. ती थोपवायची आहे. राज्यातील नागरिकांनी ही लाट थोपवायची की तिला निमंत्रण द्यायचे हे ठरवावे,असे स्पष्ट करताना नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घ्यावेत, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

आता सणवाराचे दिवस सुरू होतील. गेल्यावर्षीच्या तुलनेत आता अनेक गोष्टी आपण खुल्या केल्या आहेत. गेल्यावर्षी सणवारानंतर, गणेशोत्सवानंतर दुसरी जोरदार लाट आली. यावर्षी रुग्णसंख्या याआधीच वाढताना दिसत आहे. त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेला रोखून विषाणूंविरुद्धचे हे युद्ध जिंकण्यासाठी आणि कोरोनाच्या संकटातून पूर्णपणे बाहेर येण्यासाठी राज्य सरकारने वेगाने आरोग्य सुविधांमध्ये वाढ केलेली आहे. असे असले तरी ऑक्सिजनची मर्यादा लक्षात घेता सर्वांनीच जबाबदारीने वागावे, असे ठाकरे यांनी सांगितले.

तिसरी लाट येऊ नये आणि आलीच तर घातकता कमी करण्याची गरज आहे. कोरोनाविरुद्धचे जर हे युद्ध आहे असे आपण मानतो तर आपली सगळी शस्त्रे परजवून ठेवण्याची गरज आहे. मग आपली शस्त्रे काय आहेत, तर डॉक्टर, नर्सेस, पोलीस, अग्निशमन दल कर्मचारी सगळेच कोरोना योद्धे आहेत. त्याचबरोबर रुग्णालय व्यवस्था, यंत्रसामग्री, औषध उपलब्धता या सगळ्या गोष्टीही महत्वाच्या आहेत. अजून राज्यात दुसरी लाट कायम आहे आणि तिसर्‍या लाटेची शक्यता सांगितली जात आहे. मग त्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. त्यासाठी आपणही सज्ज राहण्याची आवश्यकता असल्याचे ठाकरे म्हणाले.

संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी सर्वतोपरी तयारी : मुख्य सचिव

यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी या वैद्यकीय परिषदेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करून संभाव्य तिसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारने सर्वतोपरी तयारी केली असल्याचे सांगितले. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये राज्यात साडेचारशेपेक्षा अधिक ऑक्सिजन प्लान्ट उभारण्यात आले असून अनेक जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा साठा करण्याची क्षमता वाढवत आहोत. प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही कुंटे यांनी सांगितले.

First Published on: September 6, 2021 3:41 AM
Exit mobile version