उद्धव ठाकरे बारसूला भेट देणार; खासदार विनायक राऊत यांची माहिती

उद्धव ठाकरे बारसूला भेट देणार; खासदार विनायक राऊत यांची माहिती

मुंबई : राजापूर तालुक्यातील (जि. रत्नागिरी) बारसू सोलगाव (Barsu-Solgaon) परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरीच्या प्रकल्पाला (Green Refinery project) स्थानिकांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्या बाजूने उभे राहण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारसूसह परिसरातील सहा गावांना भेट देणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (MP Vinayak Raut) यांनी गुरुवारी दिली.

बारसूतील प्रस्तावित रिफायनरीला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांनी आज, गुरुवारी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचाराची कहाणी ऐकल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लवकरच बारसूला येऊन स्थानिकांची भेट घेण्याचे आश्वासन दिल्याचे राऊत यांनी आज, गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

प्रशासनाची सुनावणी नौटंकी
खासदार विनायक राऊत यांनी रिफायनरीविरोधात आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांवर पोलिसांच्या माध्यमातून अत्याचार केले जात असल्याचा आरोप केला. राजापुरातील या गावात आता पोलिसांची छावणी उभी राहिली आहे. येथील ग्रामस्थ नैसर्गिक न्यायापासून वंचित आहेत. आता प्रशासनामार्फत सुरू असलेली सुनावणी ही केवळ नौटंकी असून रिफायनरीला पाठिंबा असणाऱ्या लोकांसमोर ती घेतली जात असल्याचा दावा त्यांनी केला.

जे लोक जाणकार आहेत, जे शास्त्रीय कारणांच्या आधारे रिफायनरीला विरोध करत आहेत, अशांना डांबून ठेवले गेले असल्याचा आरोप करत राऊत यांनी, पोलिसांना दूर ठेवून प्रशासनाने गावकऱ्यांशी चर्चा करावी. स्थानिकांच्या घराघरात जाऊन त्यांना प्रकल्प समजावून सांगावा, असे आवाहन केले.

नैसर्गिक न्यायापासून ग्रामस्थ वंचित
आम्हाला रिफायनरी आम्हाला नको आहे हे सरकारला लोकशाही पद्धतीने निक्षून सांगणाऱ्या कार्यकर्त्यांना रेल्वेतून उतरताच ताब्यात घेतले जात आहे. चाकारमान्यांच्या घरी रात्री-अपरात्री पोलीस जात आहेत. ते घरात नसतील तर नातेवाईकांच्या घरी जातात आणि त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतात. तडीपारीची नोटीस बजावली जाते. काहींना न्यायालयात हजर करतात. न्यायालयाने सोडण्याचे आदेश दिल्यानंतरही चार-पाच तास कोंडून ठेवतात आणि मग दुसऱ्या खटल्यात अटक करतात. नैसर्गिक न्यायापासून ग्रामस्थांना वंचित ठेवून रिफायनरी कशी दामटून न्यायची, हे प्रकार सध्या त्या बारसू आणि परिसरात सुरू झाले आहेत, असा आरोप विनायक राऊत यांनी केला.

First Published on: April 27, 2023 9:23 PM
Exit mobile version