उद्धव ठाकरेंची पंढरपूरवारी!

उद्धव ठाकरेंची पंढरपूरवारी!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. अयोध्या दौऱ्यानंतर त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. पंढरपूरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभाही होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरे आज संध्याकाळी कुटुंबासह चंद्रभागेच्या पैलतीरावर असलेल्या इस्कॉन घाटावरुन चंद्रभागेची महाआरती करणार आहेत. दरम्यान, याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ‘सामना’मध्ये पंढरीची वारी नावाने अग्रलेख लिहिण्यात आला आहे. या अग्रलेखात शिवसेनेने म्हटले आहे की, ही आमची पंढरपूर स्वारी नसून फक्त पंढरपूरची वारी आहे. त्याचबरोबर या वारीमागील प्रश्न विचारणे देखील निरर्थक असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. कारण वारी ही श्रद्धेने आणि आशिर्वादासाठी आहे.

हेही वाचा – शरयूनंतर उद्धव ठाकरे करणार चंद्रभागेतीरी आरती

‘सरकारला जागे करण्यापेक्षा घालवलेले बरे’

सामना अग्रलेखात शिवसेनेने पंढरपूर वारीचे प्रयोजन करण्यामागील कारण सांगितले आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, अयोध्येची वारी राममंदिर प्रश्नी चार वर्षे झोपलेल्या कुंभकर्णास जागे करण्यासाठी होती. पंढरपूरची वारी मरगळ आलेल्या महाराष्ट्रास जागे करण्यासाठी आहे. सरकारला जागे करण्यापेक्षा ते घालवलेलेच बरे. त्यासाठी जनतेने उसळून उठायला हवे. म्हणूनच पंढरीच्या पावन भूमीवर ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ हा लक्ष जनांच्या मुखातून उठणारा गगनभेदी जयघोष ऐकण्यासाठी आकाशामध्ये तेहतीस कोटी देवांच्या विमानांची दाटी होईल व ते आमच्या कार्यास आशीर्वाद देतील.

‘राफेल आणि बोफोर्सला भाव मिळतो’

शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे की, ‘येथे बोफोर्स आणि राफेलला भाव मिळतो तोदेखील इतका की, अंबानीस एकाच विमान सौद्यात 30 हजार कोटींचा नगदी फायदा होतो, पण शेतकर्‍याच्या मालास भाव मिळत नाही. कांदा, टोमॅटोचे भाव तळात गेले. पाच-दहा पैसे किलोचाही भाव नाही. मातीमोल भावात कांदा विकला जात आहे. राफेल सौद्यासाठी पंतप्रधान मोदी स्वतः खास लक्ष घालतात, पण कांद्याचे उत्पादन जास्त झाले म्हणून कांदा जगाच्या बाजारपेठेत पाठवा हे शेतकर्‍यांचे म्हणणे कुणी ऐकत नाही. साखर कारखाने मोडीत काढून तेथेही बेकारी वाढवण्याचे राजकीय प्रयोग सुरू आहेत. शेतकर्‍यांचे कर्ज शिवसेनेच्या दबावाने रद्द झाले, पण तरीही नवे प्रश्न उभे आहेत. सरकारने पंतप्रधानांच्या डिजिटल इंडियाचे टाळ कुटले, पण शेतकरी मात्र कोरडाच राहिला. कर्जमाफीच्या ऑनलाइन प्रकाराचा फटका शेतकर्‍यांना बसला’.


हेही वाचा – कोस्टल रोड वाद पेटणार? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आमने-सामने

First Published on: December 24, 2018 9:45 AM
Exit mobile version