उद्धव ठाकरे ऑनलाईन शिवसैनिकांना संबोधणार

उद्धव ठाकरे ऑनलाईन शिवसैनिकांना संबोधणार

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष, शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन शनिवारी साजरा होत आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही वर्धापन दिनावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे शिवसेेनेने यंदाही वर्धापन दिन साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत.

कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा वर्धापनदिन नेहमीच्या जोश, जल्लोषाविना होणार आहे. मात्र, शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी बोलणार आहेत. नुकताच शिवेसना भवन येथे भाजप, शिवसेनेमध्ये राडा झाला होता. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काहीतरी बोलतील असे शिवसैनिकांना वाटत आहे. तसेच राम मंदिरच्या मुद्यावर भाजपवर जोरदार टीका करतील, अशी अटकळही शिवसैनिकांनी बांधली आहे.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना भाजपकडून शिवसेनेवर टीका सुरू आहे. या टीकेला देखील उद्धव ठाकरे उत्तर देणार, असे शिवसैनिक पैजेवर सांगत आहेत. मात्र कायदा-सुव्यवस्था बिघडेल अशी कोणतीही वक्तव्ये मुख्यमंत्री पदावर असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याकडून होणार नाहीत, असे शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे.

First Published on: June 19, 2021 5:30 AM
Exit mobile version