जलपर्णीच्या विळख्यात ‘उल्हास नदी’

जलपर्णीच्या विळख्यात ‘उल्हास नदी’

ठाणे जिल्ह्यातील बहुतेक महानगरपालिका क्षेत्राला तसेच ग्रामपंचायतीना पाण्याची तहान भागवीत असलेल्या उल्हास नदीला पुन्हा जलपर्णीने वेढल्याने ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. उल्हास नदीच्या पात्राला एकीकडे केमिकल युक्त सांडपाण्याने प्रदूषित केले असल्याने नदीपात्राला जलपर्णीने आपल्या विळख्यात काबीज करून टाकले आहे. गेल्या काही वर्षापासून उल्हास नदी प्रदूषणाने व्याकुळ झाली आहे. चार ते पाच दिवसात ४० ते ५० किलोमीटर पर्यंत नदीचे पात्र पाणी शोषून घेणाऱ्या जलपर्णीने व्यापून टाकल्याचे दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यातील ५० लाख नागरिकांची उल्हास नदी तहान भागवीत असल्याने संबंधित विभाग याकडे सततचे दुर्लक्ष करीत असल्याने नदीचे अस्तित्व धोकादायक वळणावर येऊन ठेपले आहे. एकीकडे कारखान्याचे केमिकल युक्त पाणी सरळ पात्रात सोडले जात असतानाच यावर कुठलीही प्रक्रिया केली जात नसल्याने नदीतील परिसंस्थेवर याचा विपरीत परिणाम होत आहे. हे सर्व प्रदूषित पाण्यामुळे घडत असताना शासकीय यंत्रणा याकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमीनी व्यक्त केला आहे.

कारखान्यातून सतत सोडत असलेले केमिकल युक्त रसायनाचे दूषित पाणी (प्रामुख्याने नायट्रोजन आणि फॉस्फरस) घरगुती सांडपाणी यामुळे नदीपात्रात वेगाने वाढत असणारी जलपर्णी यांच्या कचाट्यात उल्हास नदीचा श्वास कोंडला गेला आहे. सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने यामुळे या नदीचे अनेक ठिकाणी नाल्यात रूपांतर झाल्याचे पहावयास मिळत आहे. हेंन्देै पाडा, बदलापूर, आपटे बंधारा, रायते नदी पूल ,कांबा व मोहने पंप हाऊस रेजन्सी एंटीलिया ते एन आर सी बंधाऱ्यापर्यंत या जलपर्णीने आपले विस्तृत जाळे निर्माण करीत मोहने बंधारा येथे पाणी उपास केंद्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडकल्याचे दिसून येत आहे.

औद्योगिक व निवासी भागातील सांडपाण्यावर पुरेशा प्रमाणात प्रक्रियांच्या नावाने शिमगा साजरा केला जात असल्याने याचा विपरीत परिणाम उल्हास नदीच्या पात्रात दिसून येत आहे. जलपर्णी व प्रदूषणामुळे नदी पात्रात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवकाने दोन वेळेस उपोषण केले होते. दोन्ही वेळेस यावर उपाययोजना होईल असे आश्वासन विद्यमान मंत्र्यांनी देऊन उपोषण मागे घेण्यास भाग पाडले होते. जलपर्णी पासून नदीपात्राला होत असणारा धोका उलटून लावण्यासाठी विषारी मासे नदीपात्रात सोडण्यात आले होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जलसिंचन व उपसा केंद्राच्या पात्राजवळ या जलपर्णीने मोठ्या प्रमाणात जागा व्यापून टाकल्याने भविष्यात पाणी वितरणावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ऐन उन्हाळ्यात जलपर्णीचा पसारा नदीपात्रात वाढीस लागल्याने त्या समवेत जलपर्णी मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेत असल्याने याचा फटका पाणीपुरवठ्यालाही बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

First Published on: February 5, 2023 9:49 PM
Exit mobile version