दुर्दैव! डोहात बुडून वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

दुर्दैव! डोहात बुडून वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

सुट्टी असल्यामुळे धबधबे बघायला गेलेल्या एका व्यक्तीचा आपल्या दोन मुलांसह खोल डबक्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना मावळ तालुक्यातील कामशेत जवळील कुसगाव खुर्द येथे रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. पिराजी गणपती सुळे (वय- ४५), साईनाथ पिराजी सुळे (वय- १४), सचिन पिराजी सुळे (वय-११) अशी बुडून मृत्यू झालेल्या बापलेकांची नावे आहेत.

रविवारची सुट्टी असल्याने पिराजी हे सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मोठा मुलगा साईनाथ व छोटा मुलगा सचिन या दोघांना घेऊन जवळच असलेल्या कुसगाव खुर्द येथील धबधबे पाहायला गेला होते. धबधब्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात उत्खनन केलेल्या जागेत मोठ मोठी डबकी असून ती पाण्याने तुडुंब भरली आहेत. यापैकी एका पाण्याच्या डबक्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोन्ही मुले बुडू लागली होती. या दोन्ही मुलांना वाचविण्याचा पिराजी यांनी अतोनात प्रयत्न केला होता. पण अखेर त्यांची दमछाक झाल्याने दोन लेकरांसह त्यांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या डबक्याच्या जवळपास माळावर जनावरांना चार्‍यासाठी घेऊन आलेल्या एका शेतकर्‍याने त्यांना बुडताना पाहिले आणि आरडाओरड केली. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून गावकरी घटनास्थळी गोळा झाले. गावकर्‍यांनी त्यांना डबके व त्यातील चिखलाच्या दलदलीतून बाहेर काढले. परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच गावकर्‍यांनी तिघांना बाहेर काढले होते. या घटनेचा पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.

First Published on: July 25, 2021 11:45 PM
Exit mobile version