ढिसार कारभारामुळे मुंबई विद्यापीठ युवास्पंदन स्पर्धेतून बाहेर

ढिसार कारभारामुळे मुंबई विद्यापीठ युवास्पंदन स्पर्धेतून बाहेर

मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठामागचे शुक्लकाष्ठ काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही आहे. विद्यापीठातंर्गत येणाऱ्या अनेक गोष्टीमुळे विद्यापीठाला मान खाली घालावी लागत होती. आता युवा महोत्सवाच्या नियोजनातील ढिसाळपणामुळे ‘युवास्पंदन’ या ३४ व्या पश्चिम विभाग आंतरविद्यापीठीय युवक महोत्सवातून मुंबई विद्यापीठावर अपात्रतेची टांगती तलवार लटकत आहे. सावित्रिबाई फले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठीय स्पर्धेत विद्यापीठावर अपात्र ठरल्याची नामुष्की ओढवली आहे. याचा परिणाम असा की, राष्ट्रीय स्पर्धेतही मुंबई विद्यापीठाला सहभागी होता येणार नाही.

प्रकरण काय आहे

‘युवास्पंदन’ या ३४ व्या पश्चिम विभाग आंतरविद्यापीठीय युवक महोत्सवात मुंबई विद्यापीठाचा संघ सहभागी झाला होता. मात्र मुंबई विद्यापीठाच्या संघातील एक विद्यार्थिनी नियमानुसार संघात नाही, अशी तक्रार आयोजकांना मिळाली. तक्रारीची शहानिशा करण्यासाठी अखिल भारतीय विद्यापीठ महासंघाचे समन्वयक आणि आयोजकांनी विद्यापीठाला संबंधित विद्यार्थिनीचे कागदपत्र सादर करण्यास सांगितले. त्यावर दोघांनी विद्यार्थी आणि विद्यापीठातील समन्वयकांची सुनावणीही घेतली. त्यानंतर असे लक्षात आले की संबंधित विद्यार्थीनी दहावीनंतर करण्यात येणाऱ्या पदविका अभ्यासक्रमात शिकत आहे.

नियम काय सांगतो

महासंघाच्या नियमांनुसार बारावी किमान शैक्षणिक पात्रता आहे. तसेच बारावीनंतरच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाच युवा महोत्सवात सहभागी होता येते. म्हणूनच या नियमानुसार विद्यार्थिनीला बाद करण्यात आले. संघातील एक सदस्य काही कारणास्तव बाद ठरत असेल तर पुर्ण संघ बाद करण्यात येतो. त्यामुळे ३४ वर्षांच्या कालावधीत प्रथमच विद्यापीठावर अशी वेळ आली आहे. दरम्यान संबंधित विद्यार्थिनीने एकाच वेळी अनेक विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला असल्याचेही निदर्शनास आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई विद्यापीठावर दोन वर्षांसाठी बंदीची कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.

आता एवढी नामुष्की ओढवल्यानंतर याबाबत सविस्तर माहिती घेऊन निर्णय घेऊ, असे मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाने सांगितले आहे. तर युवा महोत्सव समन्वयकांची चौकशी करुन त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप सावंत यांनी केली आहे.

First Published on: December 24, 2018 12:12 AM
Exit mobile version