महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेच्या अध्यक्षपदी खासदार रामदास तडस यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेच्या अध्यक्षपदी खासदार रामदास तडस यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी ३१ जुलै रोजी नागपुरात निवडणूक होणार होती. मात्र, काकासाहेब पवार आणि धवलसिंह मोहिते पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. यामुळे भाजप खासदार रामदास तडस यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी निवड होणार आहे. रामदास तडस हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. ही परिषद काही दिवसांपूर्वी बरखास्त करण्यात आली होती. त्यावेळी राजकीय हेतून हा निर्णय झाल्याची चर्चा होती. त्यानंतर शिंदे-भाजप सरकार सत्तेत आले. त्यानंतर कुस्तीगीर परिषदेवर ताबा मिळवण्यात भाजप यशस्वी झाला आहे. दरम्यान काकासाहेब पवार यांची सचिव, तर वैभव लांडगे यांची उपाध्यक्षपदी निवड केली जाणार आहे.

कोण आहेत रामदास तडस –

रामदास तडस हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर सलग दुसऱ्यांदा खासदार आहेत. २०१४ मध्ये दोन लाखांहून जास्त मताधिक्य मिळवत काँग्रेस उमेदवार सागर मेघे यांचा त्यांनी पराभव केला होता. याआधी रामदास तडस राष्ट्रवादीत होते. वर्धा चंद्रपूर गडचिरोली विधानपरिषदेतून तडस दोन वेळा आमदार झाले आहेत. देवळी नगरपरिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. तर राष्ट्रवादीकडून त्यांना एसटी महामंडळाचे संचालकपदही देण्यात आले होते.

First Published on: July 26, 2022 2:37 PM
Exit mobile version