थंडीचा कहर : नाशिकमध्ये ९४५ जनावरांचा मृत्यू

थंडीचा कहर : नाशिकमध्ये ९४५ जनावरांचा मृत्यू

नाशिक – एकीकडे दमदार पाऊस, खरिपाचं झालेलं अतोनात नुकसान, त्यामुळे विस्कटलेली संसाराची घडी, ही घडी सावरते न सावरते तोच ऐन रब्बीतही अवकाळी पावसाचं थैमान. अशा अस्मानी संकटामुळे द्राक्ष, कांदा, आंबा, स्ट्रॉबेरी, भाजीपाला या सार्‍या पिकांवर संक्रांत आलीय. तर, दुसरीकडे जीवघेण्या थंडीने गारठून मुकी जनावरं प्राण सोडताहेत.

जिल्ह्यात तब्बल ९४५ जनावरांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय.जिल्ह्यात बुधवारपासून पावसाची हजेरी आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. बुधवारी दिवसभर आणि रात्रीही अनेक ठिकाणी पावसाचा धुमाकूळ सुरू होता. या पावसाने पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. यासोबतच थंडीचा कडाका वाढलाय. अक्षरशः घराबाहेर पडणं नकोसं झालंय. त्यामुळे शहरातले रस्ते ओस पडलेत. दरम्यान, अचानक पडलेल्या गारठ्यामुळे जिल्ह्याच्या विविध भागांतल्या तब्बल ९४५ जनावरांचा मृत्यू झाला. हातावर पोट असणारे मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी सतत भटकंतीवर असतात. सध्याच्या प्रतिकूल वातावरणामध्येही मेंढपाळाचा नित्यक्रम सुरू आहे. अशा काबाडकष्ट करत वणवण भटकणार्‍या मेंढपाळांवर अवकाळीच्या रुपाने मोठं संकट कोसळलंय.

First Published on: December 2, 2021 9:19 PM
Exit mobile version