मुंबई, ठाण्यासह बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी

मुंबई, ठाण्यासह बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी

राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील काही ठिकाणी शनिवारी पहाटेपासूनच हलक्या पावसाने सुरुवात केली. मुंबई, ठाणे, पालघरसह बहुतांश ठिकाणी पहाटे पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज खरा ठरला आहे. यात पुढील चार ते पाच दिवसही राज्यात पावसासोबत गारपिट पडणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 7 ते 11 जानेवारी दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर 9 जानेवारीला विदर्भातील काही भागांत गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यात मुंबईतील बोरिवली, कांदिवली, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ अशा भागांत रिमझिम पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे थंडीसाठी वापरण्यात येणारे स्वेटर पुन्हा कपाटात जात नागरिकांनी छत्र्या बाहेर काढल्या आहेत.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये डिसेंबरपासूनच अवकाळी पावसासह गारपिटी पडायला सुरुवात झाली आहे. यात जानेवारीतही राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उत्तर भारतातील हवामान बदलामुळे पुढील 2, 3 दिवस अरबी समुद्रातून आर्द्रता राहणार आहे. यामुळे मध्य भारतात अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातून वारे एकत्र येतील. यामुळे महाराष्ट्रात 9 ते 11 जानेवारीदरम्यान विदर्भातील काही भागात हलका, मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे. तर 9 ते 11 जानेवारीला विदर्भातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत सांगितली.

राज्यातील राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे, तर रविवारी म्हणजेच 9 जानेवारीला राज्यातील विदर्भ भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. विदर्भ भागातील नागपूर, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गारपीट पडणार आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

First Published on: January 9, 2022 3:52 AM
Exit mobile version