Taliye Landslide: तळीये ग्रामस्थांचे तातडीने पुनर्वसन होणार – एकनाथ शिंदे

Taliye Landslide: तळीये ग्रामस्थांचे तातडीने पुनर्वसन होणार – एकनाथ शिंदे

महाड जवळील तळीये कोंडाळकरवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृत्युमुखी पडलेल्या ग्रामस्थांचे मृतदेह बाहेर काढण्याचा कामाला वेग देण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले. महाडमधील पावसाने काहीशी उघडीप दिल्याने आता मदतीचा वेग वाढवण्याचे निर्देश त्यांनी दिले. शनिवारी पुन्हा एकदा त्यांनी या घटनास्थळाला भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला.

या दुर्घटनास्थळाला शुक्रवारी रात्री उशिरा शिंदे यांनी प्रत्यक्ष जाऊन भेट दिली होती. मात्र रात्र असल्याने तेव्हा मदतकार्य करता येणे शक्य नव्हते, त्यामुळे आज सकाळी पुन्हा त्यांनी याठिकाणी भेट देऊन मदतकार्याचा काढावा घेतला. आज पहाटेपासून ठाण्याहून आलेले वैद्यकीय मदत पथक आणि टीडीआरएफच्या टीमने एनडीआरएफच्या मदतीने पुन्हा एकदा अडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू केले. मदतकार्याचा वेग वाढवण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी प्रशासनाला दिले. आज सकाळपासून ३ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बाहेर काढलेल्या मृतदेहाची संख्या ५२ एवढी झालेली आहे. या मृतदेहांची ओळख पटवून त्यांचे जागेवरच पंचनामे पार पाडावे, असे निर्देश देखील शिंदे यांनी जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

या दुर्घटनेतून बचावलेल्या ग्रामस्थांचे तातडीने तात्पुरते पुनर्वसन करायच्या सूचना शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या. या दुर्घटनेत आप्तेष्ट गमावलेल्या ग्रामस्थांचे देखील त्यांनी सांत्वन केले. लवकरात लवकर मदतकार्य पूर्ण करून सर्व मृतदेह बाहेर काढू, असं आश्वासन त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले.

First Published on: July 24, 2021 2:26 PM
Exit mobile version