मास्क वापरा.. अन्यथा १ हजार रुपये दंड भरा!

मास्क वापरा.. अन्यथा १ हजार रुपये दंड भरा!

यापूर्वीचे महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी मास्कचा वापर करा,अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल,असा फर्मान सोडल्यानंतरही अद्यापही लोकांकडून सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयांमध्ये तोंडावर मास्क न लावता नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यातच लॉक-डाऊन आता शिथिल केल्यानंतर लोकांमधील बेशिस्तीचे प्रमाण पुन्हा एकदा वाढू लागले असून परिणामी कोरेाना कोविड १९च्या आजाराचा फैलाव मोठ्याप्रमाणात होत आहे. त्यामुळे विद्यमान महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सार्वजनिक स्थळ, प्रवास यासह खासगी वाहनांमध्येही प्रवास करताना मास्क लावणे बंधनकारक असल्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून १ हजार रुपये दंड वसूल करण्यासह भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

केंद्र व राज्य सरकारने जनजीवन पूर्वपदावर आणताना देण्यात येत असलेल्या सवलतींची अंमलबजावणी करताना संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता नाकारलेली नाही. नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन कोविड १९ मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा संसर्ग वाढू शकतो, असे वारंवार स्पष्ट केले. तरीही काही नागरिक पुरेशी खबरदारी घेत नसल्याने त्यांची वैयक्तिक व इतरांचीही सुरक्षितता धोक्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मंजुरीने सोमवारी एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या आदेशातील नियम क्रमांक १० नुसार महानगरपालिका आयुक्त यांनी मास्क लावण्याबाबत नागरिकांसाठी निर्देश दिले आहेत.

या निर्देशांनुसार, कोणत्याही कारणासाठी रस्ते, कार्यालये, दुकाने, बाजार, दवाखाने, रुग्णालये यासारख्या सार्वजनिक स्थळी वावरताना प्रत्येक नागरिकाने मास्क लावणे बंधनकारक आहे. कार्यालयीन वापराच्या किंवा खासगी वाहनातून प्रवास करतानादेखील प्रत्येकाने मास्क लावणे आवश्यकच आहे. सार्वजनिक वाहतूक साधनांमधून प्रवास करतानाही मास्क लावणे गरजेचे आहे. कोणत्याही बैठकीला किंवा एकत्र येताना तसेच कार्यस्थळी मास्क लावल्याशिवाय उपस्थित राहणे हे नियमांच्या विरुद्ध मानले जाईल. महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहितेचे कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल. अशा प्रत्येक उल्लंघनासाठी एक हजार रुपये एवढा दंड आकारण्यात येईल. पोलीस विभाग तसेच महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी नेमलेल्या अधिकाऱ्यांना ही दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार असतील,असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.


हे ही वाचा – चिंता कायम! गेल्या २४ तासात ७७ पोलीस कोरोनाबाधीत!


 

First Published on: June 29, 2020 6:26 PM
Exit mobile version