एचडीआयएल मालमत्तेचा पैसा पीएमसी बँकेसाठी वापरा

एचडीआयएल मालमत्तेचा पैसा पीएमसी बँकेसाठी वापरा

पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी बँक) घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एचडीआयएल कंपनीच्या ३००० कोटींपेक्षा जास्त मालमत्तेवर टाच आणली आहे. हे पैसे पीएमसी बँकेच्या पुनर्वसनासाठी आणि पनर्जीवनासाठी उपयोगी पडतील, अशी आशा भाजप नेते आणि पीएमसी बँकेच्या घोटाळ्याचा पाठपुरावा करणार्‍या किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे. तशी विनंतीही त्यांनी ईडीला केली आहे.

पीएमसी बँकेतील कर्ज घोटाळ्यानंतर आरबीआयने बँकेवर निर्बंध लादले. त्यामुळे खातेधारकांना सहा महिन्यात फक्त एक हजार रुपये काढण्याचे बंधन होते. त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. बँकेच्या खातेधारकांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने पैसे काढण्याची मुदत प्रथम १० आणि नंतर २५ हजार रुपये अशी वाढवली. पीएमसी बँकेविरोधात किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. त्यानंतर त्यांनी ईडीकडेही पीएमसी बँक आणि एचडीआयएल कंपनीच्या व्यवस्थापनाविरोधात फौजदारी कारवाईची मागणी केली होती.

किरीट सोमय्या हे पीएमसी बँकेविरोधात आर्थिक निर्बंध लागू झाल्यापासून खातेधारकांच्या बाजूने लढा देत आहेत. त्यांनी रिर्झव्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांना विनंती करत खातेधारकांना दिलासा देण्याची विनंती केली आहे. इतकंच नव्हेतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हे मुंबईच्या दौर्‍यावर आल्यानंतर त्यांना पीएमसी बँकेची परिस्थिती विषद केली. आता सोमय्या यांनी एचडीआयएल कंपनीच्या टाच आणलेल्या मालमत्तेची रक्कम पीएमसी बँकेच्या पुनरुज्जीवनासाठी वापरण्याची विनंती ईडीला केली आहे. तसे ट्विट त्यांनी केले. त्यामुळे ईडी आता त्यावर काय भूमिका घेते हे याकडे पीएमसी बँक खातेधारकांचे लक्ष लागले आहे.

First Published on: October 14, 2019 6:09 AM
Exit mobile version