राज्यात शनिवारपासून ३० ते ४४ वयोगटाचं लसीकरण, ४५ वर्षांवरील नागरिकांचे नियमितपणे सुरु राहणार

राज्यात शनिवारपासून ३० ते ४४ वयोगटाचं लसीकरण, ४५ वर्षांवरील नागरिकांचे नियमितपणे सुरु राहणार

राज्यात उद्यापासून ( दि.१९ जून) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून त्याप्रमाणे शनिवार १९ जून पासून ३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे. ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन ऍप मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकिस्तक, जिल्हा आरोग्यधिकारी यांना त्याबाबत पत्र पाठविले असून संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

३० ते ४४ वयोगटातील लसीकरणाला प्राधान्य

केंद्र सरकारने १ मे रोजी १८ ते ४४ वयोगटातील नागिरकांचे लसीकरण करण्याची परवानगी दिली आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरुच आहे. परंतु कोरोनाप्रतिबंधक लसींचा तुटवडा असल्यामुळे राज्यातील नागरिकांचे लसीकरण करण्यात मोठा गोंधळ उडू शकतो. कोरोना लसींच्या अपुऱ्या साठा आणि पुरवठ्यामुळे ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण अद्याप पुर्ण झालेलं नाही. यामुळे लसीकरणातला गोंधळ आणि ताण कमी करण्यासाठी सध्या ३० ते ४४ वयोगटातील नागिरकांचे लसीकरण पुर्ण करण्यास प्राधान्य दिल पाहिज अशी भूमिका राज्यातील टास्क फोर्सने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली आहे.

First Published on: June 18, 2021 11:05 PM
Exit mobile version