लहान मुलांच्या लसीकरणाचा अखेर मार्ग मोकळा

लहान मुलांच्या लसीकरणाचा अखेर मार्ग मोकळा

२ ते १८ वयोगटातील लहान मुलांवर Covaxin लसीच्या वापराला DCGI ची मंजुरी

नाशिक :राज्यात साडेनऊ कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.परंतु आता सर्वात मोठे आव्हान आहे २ ते १२ व १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचे.लहान मुलांना द्यायची लस उपलब्ध झाली आहे. केंद्राच्या संमतीनंतर लवकरच लहान मुलांचेही लसीकरण होईल.तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी महाविद्यालयातच कॅम्प लावण्याचे नियोजन असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दैनिक ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

नाशिक दौर्‍यावर आलेल्या आरोग्यमंत्री टोपे यांनी राज्यातील कोविड परिस्थिती आणि लसीकरणाबाबत माहिती दिली. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्या लसीकरणाबाबत विचारले असता टोपे म्हणाले, लहान मुलांसाठी लस उपलब्ध आहे. २ ते १२ वर्षे वयोगटासाठी कोव्हॅक्सीनची, तर १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना झायडसची लस उपलब्ध आहे. केंद्र शासनाकडे आम्ही आग्रह धरत आहोत. केंद्राने परवानगी दिल्यानंतर राज्यात लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करणार असल्याचे ते म्हणाले.

त्याचप्रमाणे बुधवारपासून राज्यातील महाविद्यालये सुरू होत आहेत. या मुलांच्या लसीकरणाबाबत उच्च शिक्षण विभागाशी समन्वय साधून महाविद्यालयांमध्ये कॅम्प घेण्याबाबत नियोजन केले जात आहे. जनतेला चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्यासाठी शासनाने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यात हुडको आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून ५ ते ७ हजार कोटींचे कर्ज घेत आहोत. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यातून आरोग्य सुविधा वाढतील.

परीक्षा न्यासामार्फतच

आरोग्य विभागातील परीक्षांच्या गोंधळाबाबत टोपे म्हणाले, आरोग्य संचालकांनी स्पष्टीकरण दिले आहे. परीक्षेत कोणताही गोंधळ नाही, सर्व प्रक्रिया रितसर आहे. ज्या एजन्सीमार्फत ही परीक्षा घेतली जात आहे, त्या न्यासा कंपनीकडूनच ही परीक्षा घेतली जाणार आहे. यापूर्वी त्यांची तयारी नसल्याने न्यासाने परीक्षा घेण्याबाबत असमर्थता दर्शवली होती. परीक्षेसाठी आठ विभाग आहेत, विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम ठरवून कोणत्या विभागात परीक्षा द्यायची याचा पसंतीक्रम निवडण्याची मुभा आहे.

झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटनेचा अहवाल मागवणार

महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन दुर्घटनेप्रकरणी संबंधित एजन्सीला क्लिन चीट दिली गेली. याउलट याच एजन्सीला पुन्हा काम दिले गेले. अधिकार्‍यांवरदेखील कोणतीही कार्यवाही न झाल्याने शासनाची भूमिका संशयास्पद असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, याबाबत मला त्याची सद्यस्थिती माहीत नाही. याचा अहवाल मागवून त्याची दखल घेतली जाईल व योग्य कार्यवाही केली जाईल. ज्या बाबी गंभीर आहेत, त्याबाबत निश्चितपणे गांभीर्याने कार्यवाही केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

First Published on: October 20, 2021 6:38 PM
Exit mobile version