प्रेमाच्या अणाभाकांनी फुलला व्हॅलेंटाईन डे

प्रेमाच्या अणाभाकांनी फुलला व्हॅलेंटाईन डे

नाशिक : प्रेमाच्या आणाभाका घेत काल दिवसभर व्हॅलेंटाईन डेचा उत्साह तरुणाईत दिसून आला. यानिमित्त प्रेमी युगुलांनी एकमेकांसाठी विविध सरप्राईज दिलेे. यंदाच्या व्हॅलेंटाईन डे ला ‘कही खुशी कही गम’चे चित्र पाहायला मिळाले. व्हॅलेंटाईन वीकमध्ये ज्यांना आपले जोडीदार मिळाले ते आजचा दिवस कॅफे, रेस्टॉरंट किंवा एकांत ठिकाणी साजरा करतांना दिसून आले. त्याउलट ‘सिंगल’ मुले-मुलींनीही त्यांच्या मित्र परिवारात व्हॅलेंटाईन डे साजरा केला. एक गिफ्ट किंवा खाण्याच्या पदार्थावर दुसरा मोफत देण्याच्या योजनाही अनेक व्यावसायिकांनी या दिवसानिमित्त आणल्या होत्या. त्या योजनांनाही युवकांची चांगली पसंती मिळाली.

शहरातील कॉलेजरोड परिसरात आलेल्या कॅफे आणि गिफ्ट्स शॉपींनी प्रेमियुगलांना त्यांच्याकडे आकर्षित होतील अशा विविध भन्नाट योजना जाहीर केल्या होत्या. त्याशिवाय प्रेमाचे प्रतिक असलेल्या भेटवस्तू खरेदी करण्यासाठी सिटी सेंटर मॉलमध्येही गर्दी दिसून आली. आप्तस्वकीयांचा होणारा विरोध बघता अनेकांनी सावधगिरी बाळगत तिला किंवा त्याला भेटण्यासाठी निर्जनस्थळी जाण्याचा बेत आखला होता. ‘लाँग डिस्टन्स’मध्ये असणार्‍या प्रेमींनी एकमेकांना सोशल मीडियावर शेरोशायरीच्या शुभेच्छा देत व्हॅलेंटाईन डे साजरा केला. सोशल मीडियावरही दिवसभर व्हॅलेंटाईन डेच्या संदेशांची बरसात होत होती. ‘गर्लफ्रेंड तो कमजोर लोगो के पास होती है, बहादूर लोग तो शादी करके, खतरो सें चलते है.. हॅपी व्हॅलेंटाईन डे’ असे विनोदी संदेशही पाठवले जात होते. दरम्यान, शहरातील काही ठिकाणी तरुण-तरुणींचे असभ्य वर्तनही दिसून आले.

व्हॅलेंटाईन सेलिब्रेशनसाठी चित्रपटाचे माध्यम

व्हॅलेंटाईन सेलिब्रेशनसाठी युवकांनी चित्रपट पाहायला प्राधान्य दिले. सिटी सेंटर मॉल, कॉलेजरोडवर असणार्‍या सिनेमॅक्समध्ये तरुणांनी गर्दी केल्याचे दृश्य दिसून आले. व्हॅलेंटाईन डेला युवकांनी त्यांच्या जोडीदारासोबत रोमँटिक चित्रपट पाहायला पसंती दिली. इतर दिवसांच्या तुलनेत काल चित्रपट बघण्यासाठी युवकांची अधिक गर्दी झाली होती.

छोट्या गिफ्ट्सची अधिक चलती

मोठ्या भेटवस्तूंच्या तुलनेत छोट्यांना अधिक पसंती मिळालेली दिसून आली. त्यात हृदयाच्या आकाराचा बलून, टेडीचे किचन, प्रिंटेड मग, पिलो, गुलाबाचे फूल, चॉकलेट, ग्रिटींग्सला अधिक पसंती मिळाली.

जोडीदारासोबत रोमँटिक डेट्स

व्हॅलेंटाईन डेला खास करून युवकांनी त्यांच्या प्रेयसीसाठी विशेष डेटचे नियोजन केलेले दिसून आले. जोडीदाराला खुश करण्यासाठी कॅफेमध्ये तिच्या पसंतीची सजावट करून केक कापण्याचे नियोजन करण्यात आल्याचेही दिसून येत होते. त्याशिवाय तरुण पिझ्झा, बर्गरवरही ताव मारतांना दिसत होते.

‘व्हॅलेंटाईन डे’ची ऑफर देत फसवे संदेश व्हायरल

व्हॅलेंटाईन डे नावाच्या ऑफरखाली नागरिकांना फसवे मेसेज व्हायरल झाल्याचे दिसून आले. शहरात ’व्हॅलेंटाईन डे’च्या नावावर बनावट जाहिराती व्हायरल झाल्या. चार प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्यास सहा हजार रुपये रोख किंवा सोने मिळेल, असे सांगत २० जणांना मेसेज फॉरवर्ड करण्यास सांगितले जात होते. हा मेसेज फेक असल्याचे अनेक नागरिकांच्या उशीरा लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारीचे आवाहन केले आहे.

व्हॅलेंटाईन डेसाठी आम्ही २०० रुपायांपासून ते ५ हजार रुपायपर्यंतचे सेलिब्रेशन प्लान लाँच केले होते. शिवाय बाय वन गेट वन फ्रीची ऑफर देखील ठेवली होती आणि सर्वात जास्त युवकांनी आमच्या याच ऑफरला पसंती दिली. – राजकुमार पाल, कॅफेचालक

First Published on: February 15, 2023 3:30 PM
Exit mobile version