पालकमंत्र्यांच्या घरासमोरच विद्रोही आंदोलनाचा इशारा

पालकमंत्र्यांच्या घरासमोरच विद्रोही आंदोलनाचा इशारा

नाशिक: अब अभिव्यक्ती के सारे खतरे उठानेही होंगे, तोडने होंगे गड और मठ सब’, हे ब्रीदवाक्य घेऊन विद्रोही सांस्कृतिक चळवळीने रणशिंग फुंकले असून प्रस्थापितांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. संमेलनासाठी प्रशासनाकडून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत प्रशासनाच्या विरोधाला न जुमानता प्रसंगी पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठाण मांडू अन् संमेलन यशस्वी करूच.अशी भूमिका आयोजकांनी घेतली आहे.

फॅसिझम, शेतकरी आंदोलन समर्थन आणि संविधानाच्या सन्मानार्थ पंधरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन दि. ४ व ५ डिसेंबर रोजी केटीएचएम महाविद्यालयाच्या आवारात होत असून संमेलन यशस्वी होण्यासाठी आयोजकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. व्रिदोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सुमारे ४५० मान्यवर उपस्थित राहणार आहेत. व्रिदोही संमेलनासाठी जोरदार तयारी सुरू आहे. संमेलनाच्या विविध परवानग्यांसाठी पोलीस प्रशासनाकडे अर्ज करण्यात आला आहे. परंतू, अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. मराठी साहित्य संमेलनाला परंपरा आहे, तशीचे विद्रोही साहित्य संमेलनाचीही एक परंपरा आहे.

मात्र, विद्रोही साहित्य संमेलन होऊच नये यासाठी प्रस्थापितांकडून सर्वस्तरावर प्रयत्न चालविले असल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे. प्रशासन मदतच करणार नसेल तर परिवर्तनाची आणि संघर्षाची लढाई चालूच राहणार, असे संमेलनाचे मुख्य संयोजक राजू देसले यांनी सांगितले. संमेलनासाठी दिल्ली पंजाबसह विविध प्रांतातून पाहुणे येणार आहे. त्यांच्यासाठी शासकीय विश्रामगृहात जागा उपलब्ध होत नाही. शहरातील अनेक हॉटेल्समध्ये जागाच नसल्याचे सांगण्यात येते. यामागे षड्यंत्र असल्याचा संशयही माजी उपमहापौर गुलाम शेख यांनी व्यक्त
केला आहे.

संघर्षाची मालिका सुरूच..

शासकीय यंत्रणा मोठ्या नेत्यांच्या आहारी गेली असून प्रत्येक कामात आडकाठी निर्माण होत आहे. पोलीस आयुक्त भेटीची वेळ देत नाहीत. प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही. शासकीय यंत्रणा चालढकल करत आहे. महानगरपालिकेकडूनही कुठलेच सहकार्य मिळत नाही. त्यामुळे हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आयोजकांना अनेक ठिकाणी संघर्ष करावा लागत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी देणगीदारांवर दबाव आणून निधी गोळा केल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे.
First Published on: December 2, 2021 9:15 AM
Exit mobile version