चाक पंक्चरचं झालं निमित्त आणि गावकऱ्यांनी लुटली अवैध दारू!

चाक पंक्चरचं झालं निमित्त आणि गावकऱ्यांनी लुटली अवैध दारू!

चंद्रपूरमध्ये गावकऱ्यांनी लांबवली अवैध दारू!

अवैध दारू विक्री किंवा वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई केल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या किंवा पाहिल्या असतील. अशा घटनांमध्ये दारूचा साठा पोलिस ताब्यात घेतात आणि नंतर नष्ट करतात. पण चंद्रपूरमध्ये अशाच एका अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या स्कॉर्पियो गाडीवर चक्क गावकऱ्यांनीच धाड टाकली. आणि पंक्चर झालेल्या या गाडीवरची ही धाड दारूची विल्हेवाट लावण्यासाठी नसून गाडीतली दारू लंपास करण्यासाठी होती! पोलिसांना जोपर्यंत या प्रकाराची माहिती मिळाली तोपर्यंत आसपासच्या गावकऱ्यांना स्कॉर्पियोमधल्या ५० ते ६० पेट्यांपैकी फक्त तीनच पेट्या शिल्लक होत्या! स्कॉर्पियोचं टायर पंक्चर झाल्यामुळे गावकऱ्यांची मात्र चांदी झाली आहे.

पंक्चर काढायला गेला आणि घोटाळा झाला!

चंद्रपूरमध्ये दारूबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे दारूची वाहतूक, विक्री किंवा दारू बाळगणे याला चंद्रपूरमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांची अशा प्रकारच्या व्यवहारांवर करडी नजर कायम असते. पण या स्कॉर्पियोकडे मात्र पोलिसांचं दुर्लक्ष झालं. २९ सप्टेंबरला नागपूर-चंद्रपूर महामार्गावरच्या नंदोरी गावाजवळ सकाळी साडेसातच्या सुमारास अवैध दारू नेणाऱ्या एका स्कॉर्पियो गाडीचा टायर पंक्चर झाला. गाडीचालकाने पंक्चर काढण्यासाठी आसपास शोधाशोध सुरू केली. आणि तिथेच गोंधळ झाला!

गावकऱ्यांनी पार धुवून नेली गाडी!

ड्रायव्हर नसलेल्या एमएच ३४ एएम १७६० या स्कॉर्पियो गाडीकडे काही गावकऱ्यांचं लक्ष गेलं. हळूहळू या गाडीभोवती अनेक गावकरी गोळा झाले. कारण सगळ्यांना कळलं होतं की गाडीमध्ये दारू आहे! चालक गाडी सोडून गेला तेव्हा गाडीमध्ये दारूच्या तब्बल ५० ते ६० पेट्या होत्या. पण गावकऱ्यांनी संधी अजिबात न दवडता या पेट्या एक एक करून लंपास करायला सुरुवात केली. डीबी पथकाचे श्रीकांत नागोसे यांना ही माहिती समजताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, ते गाडीपर्यंत पोहोचेपर्यंत गाडीत फक्त तीनच पेट्या शिल्लक होत्या. दरम्यान, पोलीस घटनास्थळावर पोहोचल्याचं पाहून गाडीचालकानं घटनास्थळावरून पळ काढला असून पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह!

दरम्यान, या एकूणच प्रकरणात डीबी पथकाने केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पथकातलेच काही कर्मचारी आपले वैयक्तिक सेटिंग करून अवैध दारूला पाठिंबा देत असल्याचा संशयही परिसरातून व्यक्त केला जात आहे.

First Published on: September 30, 2018 6:01 PM
Exit mobile version