प्रसाद लाड यांचा रुबाब पाहून विनायक मेटे झाले अवाक

प्रसाद लाड यांचा रुबाब पाहून विनायक मेटे झाले अवाक

प्रसाद लाड हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले आमदार बनले आहेत.

प्रसाद लाड हे आता भाजपमध्ये चांगलेच रुळले आहेत. बाहेरच्या पक्षातून येऊनही ते लवकरच भाजपवासी झाले. गेल्या काही दिवसांपासून तर ते मुख्यमंत्र्याशी जवळीक असलेले आमदार बनले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश घेत लाड यांनी मुख्यमंत्र्यांची मर्जी तर राखलीच शिवाय विधान परिषदेची आमदारकीही पटकावली. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले असल्याने प्रसाद लाड यांचा भाजपमध्ये सध्या चांगलाच दबदबा दिसतोय. त्यांच्या याच दबदब्यामुळे आता त्यांच्याकडे सुरक्षा रक्षकांचा लवाजमा देखील दिसतो. सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात मोठ्या रुबाबात चालणारे लाड सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. आमदारकीची पहिलीच टर्म असलेल्या प्रसाद लाड यांचा लवाजमा पाहिला तर एखाद्या मंत्र्यालाही लाजवेल एवढा लाड यांचा रुबाब दिसतोय.

मेटेंची प्रसाद लाड यांना कोपरखळी..

आमदार प्रसाद लाड काही कामानिमित्त महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटण्यासाठी मंत्रालयात आले होते. यावेळी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे हे चंद्रकांत पाटील यांच्या दालना बाहेरच पत्रकारांसोबत गप्पा मारत होते. तेवढ्यात प्रसाद लाड हे आपल्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यासह चंद्रकांत पाटील यांच्या दालनाजवळ आले. यावेळी तिथे असलेल्या विनायक मेटे यांचे लक्ष लाड यांच्या ताफ्याकडे गेले. चंद्रकांतदादा यांच्या दालनात जात असलेल्या प्रसाद लाड यांना उद्देशून मेटे म्हणाले की, “अरे प्रसाद अजून तुला मंत्री व्हायचं आहे”, अशी कोपरखळी मेटेंनी लाड यांना मारली. मात्र घाईत असलेल्या प्रसाद लाड यांचे त्यांच्या या बोलण्याकडे लक्ष न गेल्यामुळे ते थेट चंद्रकांत पाटील यांच्या दालनात गेले. मात्र यावेळी तिथे असलेल्या सगळ्यांनाच लाड यांचा ताफा बघून एकच चर्चा रंगली.

आपलं महानगरची नाशिक आवृत्ती १८ जानेवारी पासून सुरु
First Published on: January 16, 2019 7:59 PM
Exit mobile version